जिल्हा परिषदेवर विद्यार्थी आज धडकणार
By admin | Published: July 3, 2017 12:46 AM2017-07-03T00:46:48+5:302017-07-03T00:46:48+5:30
जांभोरा येथील जिल्हा परिषद पूर्ण माध्यमिक शाळेत मुख्याध्यापकांसह तीन शिक्षकांचे पद रिक्त आहेत.
जांभोरा येथील शाळा बंद आंदोलन : तोडगा न काढल्याने रोषाचे वातावरण
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : जांभोरा येथील जिल्हा परिषद पूर्ण माध्यमिक शाळेत मुख्याध्यापकांसह तीन शिक्षकांचे पद रिक्त आहेत. मागील वर्षांपासून केवळ प्रशासनाने आश्वासन दिले मात्र कायम शिक्षक दिले नाही. त्यामुळे येथे शिक्षकांचे पद रिक्त असल्याने जांभोरा येथील विद्यार्थी सोमवारला जिल्हा परिषदेवर धडकणार आहेत.
शिक्षकांवर कामांचा ताण निर्माण झालेला असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहेत. त्याविरोधात ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी शिक्षकांच्या मागणीसाठी २६ जून पासून शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. मात्र, प्रशासनाने अजूनही योग्य तो तोडगा काढलेला नसल्याने सोमवार विद्यार्थी जिल्हा परिषदेवर धडक देणार असल्याचे आंदोलकांनी कळविले आहे.
मोहाडी पंचायत समितीचे उपसभापती, जांभोरा ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी कायमस्वरुपी शिक्षकांच्या मागणीसाठी शाळा बंद आंदोलन २६ जून पासून सुरु केले. पालकांनी छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करून शाळेला कुलूप ठोकले. त्यामुळे शिक्षकांना शाळेत जाता येत नाही. शिक्षक नियमित शाळेपर्यंत पोहचत असून शाळा बंद असल्याने कागदावर सह्या करून ते कागद भिंतीवर लावले जात आहे. पालकांची मागणी न्याय असून कामांचा ताण त्यामुळे वाढत असल्याने शिक्षकांची भरती झाली पाहिजे, अशी भावना शिक्षकांनी पालकांच्या आंदोलनादरम्यान व्यक्त केली.
आंदोलनादरम्यान खंड विकास अधिकारी कृष्णा मोरे यांनी शाळेला भेट देवून आंदोलकांशी चर्चा केली. एक कायमस्वरुपी तर दोन शिक्षक तात्पुरते देण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र, कायमस्वरुपी शिक्षकांच्या मागण्यांवर पालक व आंदोलनकर्ते अडून बसल्याने तोडगा निघाला नाही. मागील वर्षीप्रमाणे प्रशासन वेळ काढण्यासाठी लॉलीपॉप देत असल्याची भावना आंदोलकांची झाल्याने तोडगा निघाला नाही.
गट शिक्षणाधिकारी रमेश गाढवे यांनी सुद्धा शुक्रवारी भेट घेऊन आंदोलनकांशी चर्चा केली. आंदोलक कोणत्याही परिस्थितीत कायम स्वरुपी शिक्षकांच्या मागण्यांवर ठाम असल्याने तोडगा निघाला नाही. त्यामुळे आंदोलक सोमवार शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांसह जिल्हा परिषदेवर धडक देणार आहे. यावर जिल्हा परिषद प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.