उमरेड-करांडला-पवनी व्याघ्र प्रकल्पात अभ्यासदौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:37 AM2021-02-11T04:37:05+5:302021-02-11T04:37:05+5:30

चिचाळ : भंडारा, नागपूर जिल्ह्यांतील पवनी, भिवापूर, उमरेड, कुही तालुक्याच्या जंगलाचा समावेश करून विस्तारलेल्या उमरेड करांडला- पवनी व्याघ्र प्रकल्पात ...

Study tour at Umred-Karandla-Pawani Tiger Project | उमरेड-करांडला-पवनी व्याघ्र प्रकल्पात अभ्यासदौरा

उमरेड-करांडला-पवनी व्याघ्र प्रकल्पात अभ्यासदौरा

googlenewsNext

चिचाळ : भंडारा, नागपूर जिल्ह्यांतील पवनी, भिवापूर, उमरेड, कुही तालुक्याच्या जंगलाचा समावेश करून विस्तारलेल्या उमरेड करांडला- पवनी व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी अभ्यासदौरा पार पडला. वैनगंगा नदीवर असलेल्या गोसे येथील इंदिरा सागर प्रकल्पालगत पवनी- निमगाव जंगलातील ५५० हेक्‍टर क्षेत्रात व्यापलेल्या उमरेड- करांडला- पवनी व्याघ्र प्रकल्पाची व्याप्ती निराळीच आहे.

पवनी प्रवेशद्वारावरून खापरी रस्त्याने काही अंतर पुढे जाताच महालगाव गवतकुटी पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. या गवतकुटीच्या उत्तरेस जाणारा रस्ता पर्यटकांना पुढे- पुढे नेताना आनंददायी तितकाच भयावहदेखील आहे. या रस्त्यावर चालणारी जंगल सफारी रणगाड्यासारखी शांतपणे मार्गक्रमण करीत जात असते. येथून काही अंतरावर असलेल्या येणाळी तलाव खापरीकडे पर्यटकांची आगेकूच होते. वाघ पाहण्यासाठी मनात आसुसलेल्या नजरांची दाटी असते. मात्र, वाघांची साइड मिळेना! कदाचित जंगल भ्रमणाची आमची वेळ चुकली असावी? आम्ही दम सोडला नाही. पुढे दिसेल या आशेने दम धरून होतो. पुढे जात असताना पिसारा फुलवून लांब अंतरावर असणारा मोर बघताना आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. जणू उबड्या आल्यागत आम्ही गाडीवर खुशीने बेभान झालोत. मनात अन्य जनावरे दिसण्याच्या आशा पल्लवित झाल्या. सरळ आम्ही निघालो नागपूर सीमेलगत असलेल्या निशाण टेकडी वॉच टॉवरकडे... यावेळी सोबत सहायक क्षेत्राधिकारी डी.आर. जायस्वाल होते. टॉवरखाली असलेली कर्मचाऱ्यांची संरक्षक कुटी बघताना आनंद वाटला. यातील बनलेला चहा आम्हा पत्रकारांची मेजवानी ठरला. सहायक क्षेत्राधिकाऱ्यांसोबत गप्पा मारण्यात येथे अर्धा तास गेला. नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या या वॉच टॉवरवर चढून आम्ही निसर्गाच्या विहंगम दृश्याच्या जडणघडणीचा नजारा पाहण्याचा आनंद घेतला. येथून गोसे धरणाचे दृश्य ढगाळ वातावरणाने आभाळ कुशीत घेतल्यासारखे वाटले. जंगलातील निसर्गरम्य दृश्याची ठेवण बघताना हायसे वाटणारे प्रसंग मन मोहित करून गेले. डोंगराळ रस्ता, चढ- उतार ओलांडताना कोकणातील रस्त्यांची आठवण झाली. वाघाचे लोकेशन आम्ही घेत गेलो. मात्र, यादिवशी आम्हाला वाघाने दर्शन दिले नाही; पण रानगव्याचे दर्शन झाले. यासंबंधी जंगल कर्मचाऱ्यांना विचारले असता दुपारची वेळ असल्याने वाघ दिसला नाही, असे सांगण्यात आले. अभ्यासदौऱ्याप्रसंगी मनोहर मेश्राम, महादेव शिवरकर, प्रशांत पिसे, लेखराम मेंढे, प्रकाश हातेल आदी उपस्थित होते.

बॉक्स

काय आहे व्याघ्र प्रकल्पात?

पर्यावरण समृद्धीचे प्रतीक म्हणजे वाघ असून, उमरेड करांडला पवनी व्याघ्र प्रकल्पात एकूण वाघ- ५, बिबट- १२, सांबर, अस्वल, ससा, मोर इत्यादी जनावरे मोठ्या प्रमाणात आहेत. मागील काळात आशिया खंडातील जय नावाचा वाघ पर्यटकांसाठी संजीवनी ठरला होता. याला बघण्यासाठी दुरूनदुरून मोठ्या संख्येने पर्यटक यायचे. आता प्रकल्पात असलेले वाघही पर्यटकांना भुरळ घालत आहेत. हिंस्र पशुंबरोबरच येथे नैसर्गिक नयनरम्य ठिकाण आहेत. या तलावांची संख्या आठ, तर बोडी एक आहे. आडवळणाचे रस्ते चढता- उतरताना मोठा आनंद मिळतो. प्रकल्पात एकूण पाच वॉच टॉवर आहेत. निशांत टेकडी, मालाई, चक्रीरोड, गोसाई देवी पहाडी, भांगसारा तलाव, अशी प्रस्तुत टॉवरची नावे आहेत, तर एक ठाणा तलाव नावाचा टॉवर निर्माणाधीन आहे.

Web Title: Study tour at Umred-Karandla-Pawani Tiger Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.