रंगबिरंगी होळीसाठी सजली बाजारपेठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 11:38 PM2020-03-06T23:38:42+5:302020-03-06T23:39:29+5:30
होळी हा सवार्चा आनंदाचा सण आहे. या सणाची अनेक जण आतुरतेने वाट पहात असतात. प्रत्येकाने हा आनंदाचा आणि भेटीचा सण साजरा करावा, पण कोणतेही प्रदूषण होणार नाही, पाण्याची नासाडी होणार नाही, याची जाणीव ठेवून प्रदूषणमुक्त होळी साजरी करा, असे आवाहन विविध सामाजिक व पर्यावरणवादी संस्थांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : होळी-धुळवडीकरीता बाजारपेठ सजली असून उलाढाल वाढली आहे. रंग, पिचकारी, गाठींच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. येथील मोठा बाजार परिसर, गुजरी चौक, राजीव गांधी चौक परिसर, खात रोड परिसरात होळी-धुळवडीसाठीच्या वस्तू मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आल्या आहेत.
विक्रीसाठी आलेल्या साहित्यांमध्ये पिचकारी, टँक, फुगे यांचे दर सुमारे १० ते २०० रुपयांपर्यंत आहेत. या सर्व पिचकारी, टँकवर सध्या कार्टून आणि मोटू-पतलू, छोा भीम यासह अन्य कॉर्टूनच्या प्रतीमा रेखाटल्या आहेत. छोटा भीम, अर्जून, हनुमान, राम अशा विविध कार्टूनच्या पिचकाऱ्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. बंदूक पिचकारी पारंपरिक असून त्याचे दर सुमारे १५ ते ५० रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. अभिनेत्यांची छायाचित्रे असलेल्या पिचकाऱ्यांसह विविध फळे, बंदुक, मनी बँक, क्रिकेटच्या बॅटची प्रतिकृती असलेल्या पिचकाऱ्या बाजारात दिसून येत आहेत. रंगबिरंगी गुलाल, पाण्याचे रंग, डबीतील रंग, गोल्डन, स्टार्च रंगही विक्रीसाठी आले आहेत. यावर्षी रंगांना चांगली मागणी असल्याचे साहित्यविक्रेते नितीन कुंरजेकर यांनी सांगितले.
गाठीचा गोडवा वाढला
गाठी सुमारे ८० ते १०० रुपये प्रती किलोने विकल्या जात आहेत. गाठीचे हार ४० ते ६० रुपये आणि त्यापुढे वजनानुसार व नगानुसार गाठी बाजारात उपलब्ध आहेत.
प्रदूषणमुक्त होळी साजरी करण्याचे आवाहन
होळी हा सवार्चा आनंदाचा सण आहे. या सणाची अनेक जण आतुरतेने वाट पहात असतात. प्रत्येकाने हा आनंदाचा आणि भेटीचा सण साजरा करावा, पण कोणतेही प्रदूषण होणार नाही, पाण्याची नासाडी होणार नाही, याची जाणीव ठेवून प्रदूषणमुक्त होळी साजरी करा, असे आवाहन विविध सामाजिक व पर्यावरणवादी संस्थांनी केले आहे. यासंदर्भात ग्रीन हेरीटेजचे संस्थापक मो.सईद शेख म्हणाले, होलिकोत्सव साजरा करताना आपल्या भागातील कचरा, वाईट प्रवृत्तीचा नाश करा, होळीसाठी झाडाची कत्तल करणे योग्य नाही. कोणतेही प्रदूषण आणि कुणास त्रास, इजा होणार नाही, याची दक्षताही नागरिकांनी घ्यावी. रासायनिक द्रव्ये मिसळलेले रंग वापरू नका असे आवाहनही त्यांनी केले.
रंगांचे विविध पॅकेट
आईस कूल, नैसर्गिक रंग, रासायनिक रंग अशा तीन पद्धतीतील रंग बाजारात उपलब्ध आहेत. आईस कूल रंग सुमारे २५ ते ५० रुपये, नैसर्गिक रंग सुमारे ५० ग्रॅमपासून पॅकेटमध्ये उपलब्ध असून त्याचे दर २० ते ५० रुपयांपर्यंत आहेत. रासायनिक रंगाच्या पुड्याही बाजारपेठेत उपलब्ध आहेत.