संघटनांचे तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 06:00 AM2019-12-04T06:00:00+5:302019-12-04T06:00:58+5:30
गत काही वर्षापासून शिक्षण क्षेत्रातील प्रश्न अधिक गंभीर बनत चालले आहे. शालेय, महाविद्यालयीन शिक्षणाचे खासगीकरण होऊन तेथे पैशांचा बाजार मांडला जातोय. जेएनयू सारख्या प्रगत व दर्जेदार विद्यापीठामध्ये भरमसाठ शुल्कवाढ केली जातेय. तेथे विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुष हिंसाचार केला जातोय. अंध अपंग उच्चशिक्षित विद्यार्थ्यांना तुरुगात डांबले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : शिक्षणाचे खासगीकरण, बाजारीकरण, विद्यापीठातील भरमसाठ शुल्कवाढ तसेच विद्यार्थ्यांच्या संस्थात्मक धोरणांच्या निषेधार्थ तुमसर शहरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक संघटनांच्या वतीने उत्स्फूर्तपणे आंदोलन करण्यात आले. समता सैनिक दल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम आणि सजग नागरिक मंच या संघटनांनी तहसीलदांरामार्फत राष्ट्रपती व मानव संसाधन व विकास मंत्रालयाला निवेदन दिले.
गत काही वर्षापासून शिक्षण क्षेत्रातील प्रश्न अधिक गंभीर बनत चालले आहे. शालेय, महाविद्यालयीन शिक्षणाचे खासगीकरण होऊन तेथे पैशांचा बाजार मांडला जातोय. जेएनयू सारख्या प्रगत व दर्जेदार विद्यापीठामध्ये भरमसाठ शुल्कवाढ केली जातेय. तेथे विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुष हिंसाचार केला जातोय. अंध अपंग उच्चशिक्षित विद्यार्थ्यांना तुरुगात डांबले जात आहे. अशा परिस्थितीत आयआयटी मद्रास येथील फातीमा लतीफ सारख्या अनेक विद्यार्थ्यांचे संस्थात्मक बळी घेतले जात आहेत. या सर्व घटनांमागे राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) कारणीभूत आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. या सर्व परिस्थितीवर उपाय म्हणून शिक्षणाचे खासगीकरण त्वरीत बंद करून शिक्षणाचे राष्ट्रीयीकरण करण्यात यावे, सर्वांना समान, मोफत, दर्जेदार शिक्षण सरकारद्वारे पुरविण्यात यावे, शिक्षणावरील सरकारच्या खर्चात वाढ करण्यात यावी, आपल्या हक्कांसाठी लोकशाही पद्धतीने लढणाºया विद्यार्थ्यांवरील कारवाई मागे घेण्यात यावी, सर्व प्रकारची शुल्कवाढ रद्द करून सरकारने विनामुल्य शिक्षणाची व्यवस्था करावी, नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण रद्द करून त्या जागी समतामूलक शिक्षण धोरण त्वरीत राबवावे अशा अनेक मागण्या निवेदनात नमूद आहेत.
या आंदोलनादरम्यान जय डोंगरे, गणेश बर्वे, सुलभा हटवार, डॉ. प्रिदर्शना शहारे, मीरा भट, डॉ.सुनील चवळे, राहुल डोंगरे व राजेश देशमुख यांनी मार्गदर्शन केले. या आंदोलनातील सर्वांनीच शिक्षणाला मूलभूत अधिकाराचा दर्जा मिळून फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांप्रमाणे शिक्षण क्षेत्रात परिवर्तन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच गरज पडल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन अधिक तीव्र करावे लागेल, असा इशाराही दिला. मागण्यांचे निवेदन तुमसरचे तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांच्याकडे सोपविण्यात आले.या आंदोलनाला तुमसरातील विद्यार्थी, पालक व सुज्ञ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.