फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल करा
By admin | Published: September 30, 2016 12:47 AM2016-09-30T00:47:37+5:302016-09-30T00:47:37+5:30
मोहगावदेवी येथील राईसमिल मालकाने मोहगाव व परिसरातील शेतकऱ्याकडून लाखो रूपयांचे धान खरेदी करून पोबारा केला आहे.
पत्रपरिषद : राजेंद्र पटले यांची मागणी
मोहाडी : मोहगावदेवी येथील राईसमिल मालकाने मोहगाव व परिसरातील शेतकऱ्याकडून लाखो रूपयांचे धान खरेदी करून पोबारा केला आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाने याची दखल घेवून या राईस मिलचा लिलाव करून शेतकऱ्यांचे पैसे द्यावे व सदर राईसमिल मालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांनी आयोजित पत्रपरिषदेत केली.
मोहगाव देवी येथील शेतकऱ्यांनी विश्वासावर धान दिले. शेतकरी धानाचा वजन काटा करून पावती आपल्याजवळ ठेवतात. याचाच फायदा घेऊन तिरूपती राईस मिलमध्ये धान खरेदीचा हिशोब ठेवण्यासाठी महेश रोकडे रा.मोहगाव देवी, अनिल मलेवार रा.मोहाडी, श्रीराम दिपटे रा.वरठी, बांते रा.दहेगाव असे पाच जण काम करीत होते. ते २००९ पासून राईसमिल बंद होईपर्यंत कामावर होते. त्या चेकवर मालकाची स्वाक्षरीसुद्धा आहे. मात्र हे धनादेश वठले नाही. शेतकरी अशिक्षित असल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली नाही. शेतकऱ्यांजवळ धानाचे वजन केल्याची तसेच हिशोबाच्या पावत्या आहेत. मात्र पोलीस याला पुरावा मानण्यासाठी तयार नाहीत. २ आॅक्टोबरला ग्रामपंचायतमध्ये होणाऱ्या ग्रामसभेत हा मु्द्दा चर्चेत येणार आहे. (शहर प्रतिनिधी)
खोब्रागडे म्हणतात, आपला संबंध नाही
मोहाडी : मोहगावदेवी येथील तिरुपती राईस मिलमध्ये धानाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांशी माझा कुठलाही व्यवहार झालेला नसून सद्यस्थितीत या राईसमिलशी माझा कुठलाही संबंध नसून माझ्यावर होणारे आरोप तथ्यहीन असल्याचे विजय खोब्रागडे यांनी म्हटले आहे. तिरुपती राईस मिलच्या मालकाने शेतकऱ्यांजवळील धान खरेदी केले. मात्र पैसे देण्यास नकार दिला. असा आरोप शेतकऱ्यांनी विजय खोब्रागडे यांच्यावर केला होता. याबाबत खोब्रागडे म्हणाले, या राईसमिलशी आपला संबंध नाही. ज्या शेतकऱ्यांशी मी धान खरेदी केले असेल तर धानाचे चुकारे देण्यास तयार आहे. मात्र संबंध नसताना हेतुपुरस्सर आरोप करण्यात आले आहेत. ज्यांनी धान खरेदी केले त्यांनीच पैसे द्यावे १ एप्रिल २००९ नंतर संबंधित राईस मिलशी माझा संपर्क नसल्याचे सांगून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचेही त्यांनी सांगितले.