मेहनत, चिकाटीमुळेच स्पर्धा परीक्षेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 09:36 PM2018-10-03T21:36:33+5:302018-10-03T21:36:53+5:30
केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग व अन्य स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचे असल्यास मेहनत आणि चिकाटीशिवाय पर्याय नाही. या परीक्षांची तयारी मानसिकदृष्टया करणे गरजेचे असून परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक पातळीवर स्वत:ला सिध्द करणे म्हणजेच स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करणे होय, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग व अन्य स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचे असल्यास मेहनत आणि चिकाटीशिवाय पर्याय नाही. या परीक्षांची तयारी मानसिकदृष्टया करणे गरजेचे असून परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक पातळीवर स्वत:ला सिध्द करणे म्हणजेच स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करणे होय, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सामाजिक न्याय विभाग भंडारा यांच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम तसेच निवडणूक विभागाच्या वतीने मतदार जागृती कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक न्याय भवन येथील सभागृहात करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
केंद्रीय लोकसेवा परीक्षा पास होवून भंडारा येथे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प या पदावर रुजु झालेले श्रीकृष्णनाथ पांचाळ, उपजिल्हाधिकारी निवडणूक विलास ठाकरे, उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, गटविकास अधिकारी धीरज पाटील, राहूल काळे व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आशा कवाडे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.
श्रीकृष्णनाथ पांचाळ म्हणाले की, प्रथम परीक्षेचा अभ्यास करा व नंतर परीक्षेसाठी अभ्यास करा. स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना यश हमखास मिळेल हा विचार डोक्यात ठेवून तयारी न करता मेहनत आणि जिद्द डोक्यात ठेवून तयारी करावी. यश केव्हा मिळेल याची खात्री नसल्यामुळे नाउमेद न होता सातत्य व मनाचा दृढ संकल्पच यशाची शिखरे सर करु शकतात.
प्रत्येकाने कर्तव्य भान जपणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षेची तयार करण्यासाठी शासनाच्या अनेक संस्था आहेत. या संस्थांमध्ये परीक्षेची संपूर्ण तयारी करुन घेतली जाते. स्पर्धा परीक्षेसाठी आर्थिक स्तर महत्वाचा नसून मनाची तयारी महत्वाची असते. नियमित वाचन, भाषेवर प्रभुत्व, नोटस् काढणे, गट चर्चा याबाबी परीक्षा पास होण्यासाठी गरजेच्या आहेत.
जिद्द, मेहनत, नियोजन, मानसिक तयारी , न्युनगंड न बाळगणे व स्वत:ला सिध्द करण्याचे प्रामाणिक प्रयत्न यामुळे स्पर्धा परीक्षेत हमखास यश मिळते, असे उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील यांनी सांगितले.
यावेळी बोलतांना उपजिल्हाधिकारी महिरे म्हणाले की, मेहनतीशिवाय स्पर्धा परीक्षेस पर्याय नाही. आपण ठरविलेले लक्ष गाठण्यासाठी नियमित अभ्यास व नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सामाजिक न्यायभवनातील भंडारा शहरातील शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.