यंदा यंत्रणेतील समन्वयाने पूर नियंत्रणात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:42 AM2021-09-17T04:42:05+5:302021-09-17T04:42:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : पूर्वसूचनेशिवाय प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग भंडारा जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण करतो, हा आजवरचा अनुभव आहे. गतवर्षी ...

Success in flood control with coordination in the system this year | यंदा यंत्रणेतील समन्वयाने पूर नियंत्रणात यश

यंदा यंत्रणेतील समन्वयाने पूर नियंत्रणात यश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : पूर्वसूचनेशिवाय प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग भंडारा जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण करतो, हा आजवरचा अनुभव आहे. गतवर्षी संजय सरोवराच्या विसर्गामुळे भंडारा जिल्ह्यात हाहाकार उडाला होता. या अनुभवातून धडा घेत प्रशासनाने यंदा विविध यंत्रणांत समन्वय ठेवून पूर नियंत्रणात आतापर्यंत यश मिळवले आहे. गोसे प्रकल्पातून पाण्याचा नियंत्रित विसर्ग होत आहे. आंतरराज्यीय समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सर्व परिस्थितीवर करडी नजर ठेवून आहे.

भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीला दरवर्षी पूर येतो. महापुराचा फटका नदीकाठावरील गावांना बसतो. शेकडो हेक्टर शेती उद्ध्वस्त होते. गतवर्षी मध्य प्रदेशातील संजय सरोवर आणि जिल्हा प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे महापुराचा सामना करावा लागला. तब्बल तीन दिवस भंडारा जिल्हा जलमय झाला होता. ४४ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. हा अनुभव पाठीशी असल्याने यंदा पूरपरिस्थिती नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या. मे महिन्यातच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नियोजन केले होते. छिंदवाडा, शिवनी, बालाघाट, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांतील नियंत्रण कक्षात समन्वय निर्माण करण्यात आला. जिल्हा नियंत्रण कक्ष, पाटबंधारे नियंत्रण कक्ष आणि पोलीस नियंत्रण कक्ष एकमेकांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे कोणत्या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला, धरणाची पाणी पातळी किती आहे, किती दरवाजे उघडले याची माहिती उपलब्ध होते. त्या नियोजनावर गोसे खुर्द प्रकल्पाच्या पाण्याचा किती विसर्ग करावा लागेल, याचा अंदाज घेऊन पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे यावर्षी गोसे खुर्द प्रकल्पाचे आतापर्यंत १५ वेळा दरवाजे उघडूनही प्रकल्पातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यात आली.

बॉक्स

आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी संपर्कात

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांतील आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी दररोज एकमेकांच्या संपर्कात असतात. त्यांच्यात माहितीचे आदान-प्रदान केले जाते. अतिवृष्टी झाली की त्याची तत्काळ सूचना दिली जाते. त्यामुळे गोसे खुर्दचे पाणी नियंत्रित ठेवणे शक्य होते. यासोबतच प्रकल्पातील पाण्याची माहिती इंग्रजीतून उपलब्ध असते. परंतु, ती यावर्षी नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मराठीतूनही उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नागरिकांना नदीच्या पाण्याचा अंदाज येतो.

बॉक्स

पुराच्या पाण्याचा वेग प्रतितास १० किमी

पुराच्या पाण्याला कितीही वेग असला तरी प्रतितास १० किलोमीटरपेक्षा जास्त वेग नसतो. त्यामुळे संजय सरोवर, कालीसराट, पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडल्यानंतर वैनगंगा नदी येथील कारधा आणि गोसे प्रकल्पाला येण्यास किती कालावधी लागतो, याची निश्चिती केली जाते. त्यानंतर गोसे प्रकल्पाचे पाणी किती सोडायचे, याचा निर्णय घेतला जातो. तसेच यावर्षी सर्वांची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे पूर नियंत्रण शक्य आहे.

कोट

गतवर्षीचा अनुभव पाहता, यावर्षी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सतर्क आहे. आपत्ती व्यवस्थापनचे सर्व अधिकारी एकमेकांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे पाण्याचा विसर्ग नियंत्रित पद्धतीने होत आहे. यानंतरही पूरपरिस्थिती उद्भवल्यास जिल्हा प्रशासन परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज आहे.

- अभिषेक नामदास, जिल्हा आपत्ती अधिकारी.

Web Title: Success in flood control with coordination in the system this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.