संचारबंदीत होणारे तीन बालविवाह रोखण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:32 AM2021-04-26T04:32:09+5:302021-04-26T04:32:09+5:30
भंडारा : कोरोना संचारबंदीचा फायदा घेत बालविवाह करण्याच्या तयारीत असलेल्या तीन कुटुंबांचे मन वळविण्यात महिला व बालविकास विभागाला यश ...
भंडारा : कोरोना संचारबंदीचा फायदा घेत बालविवाह करण्याच्या तयारीत असलेल्या तीन कुटुंबांचे मन वळविण्यात महिला व बालविकास विभागाला यश आले असून, जिल्ह्यात होऊ घातलेले तीन बालविवाह रोखण्यात आले. यासाठी गाव बाल संरक्षण समितीची मोलाची भूमिका ठरली.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग सुरू आहे. संपूर्ण प्रशासन कोरोना प्रतिबंधासाठी झटत आहे. शासनाने संचारबंदी घोषित केली. अशा परिस्थितीचा फायदा घेत भंडारा तालुक्यातील एका अल्पवयीन बालिकेचा विवाह सूरत (गुजरात) येथील युवकाशी लावून देण्याचा प्रयत्न कुटुंबीयांनी सुरू केला होता. तसेच लाखांदूर तालुक्यातील एका बालिकेचा विवाह नागपूर जिल्ह्यातील युवकासोबत २१ एप्रिल रोजी होणार असल्याची गोपनीय माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीन साठवणे यांना मिळाली, तर मोहाडी तालुक्यातील अल्पवयीन बालिकेचा भंडारा तालुक्यातील तरुणासोबत २६ एप्रिल रोजी बालविवाह होणार होता. या तीनही प्रकरणांची माहिती मिळाल्यावर महिला व बालविकास विभागाने या कुटुंबांची भेट घेतली. त्यांचे समुपदेशन केले. त्यावेळी सर्व बालविवाह थांबविण्यात आले. तसेच आईवडिलांकडून मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नाही, असे हमीपत्रही घेण्यात आले.
ही कारवाई जिल्हा बालसंरक्षण कक्ष येथील महिला व बालविकास अधिकारी विजय नंदागवळी, संरक्षण अधिकारी नितीन साठवणे, शिल्पा वंजारी, सुधीर सरादे, विजय बेंदवार, सविता सोनकुसरे, जयश्री मेश्राम, सरिता रहांगडाले, डिंपल बडवाईक, लोकप्रिया देशभ्रतार, लाखांदूरचे पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम यांनी केली. तीन मुलींचे होणारे उद्ध्वस्त आयुष्य यामुळे सावरण्यात आले.
बाॅक्स
बालविवाह होत असल्याची माहिती द्या
जिल्ह्यात बालविवाह होत असल्याची कुणाकडे माहिती असल्यास त्यांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय भंडारा येथे माहिती द्यावी किंवा १०९८ या राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांकावर बालहितार्थ सहकार्य करावे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजय नंदागवळी यांनी सांगितले. बालविवाह ही गंभीर समस्या आहे. १८ वर्षांखालील मुलगी व २१ वर्षांखालील मुलाचा विवाह करणे व त्यासाठी सहकार्य करणे हेदेखील गुन्हा असल्याचे संरक्षण अधिकारी नितीन साठवणे यांनी सांगितले.
बाॅक्स
वऱ्हाडी, नातेवाईक अन् भटजी, स्वयंपाकीवरही कारवाई
बालविवाह करणे हा कायद्याने दखलपात्र गुन्हा आहे. बालविवाह करणाऱ्या घरातील मंडळीसोबतच लग्नाला उपस्थित वऱ्हाडी, मंडप डेकोरेशन वाले, पत्रिका छपाई करणारे एवढेच नाही तर लग्न लावून देणारे भटजी आणि स्वयंपाक्यावरही गुन्हा दाखल होऊ शकते. अशा प्रकरणामध्ये दोन वर्ष कारावास आणि एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे.