अथक प्रयत्नाअंती मेंदूवर यशस्वी शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 10:48 PM2018-07-04T22:48:30+5:302018-07-04T22:49:11+5:30
रस्ते अपघातात जखमी झालेल्या एका रूग्णाच्या डोक्यात रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या होत्या. ही जटील शस्त्रक्रिया तीन तासांच्या डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने यशस्वी झाली असून या रूग्णाला जीवनदान मिळाले आहे. ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया येथील लक्ष हॉस्पीटलमध्ये करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : रस्ते अपघातात जखमी झालेल्या एका रूग्णाच्या डोक्यात रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या होत्या. ही जटील शस्त्रक्रिया तीन तासांच्या डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने यशस्वी झाली असून या रूग्णाला जीवनदान मिळाले आहे. ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया येथील लक्ष हॉस्पीटलमध्ये करण्यात आली.
या शस्त्रक्रियेसाठी दोन लाख रूपयांचा खर्च येतो. आमदार डॉ. परिणय फुके यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळाल्यामुळे या रूग्णाचा जीव बचावला. भोजापूर येथील राजेश सेलोकर (३७) हा मजुरीचे काम करतो. २८ जून रोजी दुपारी १२.३० वाजता दुचाकी अपघातात जखमी झाला. त्यानंतर त्याला लक्ष मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले. यावेळी राजेशच्या डोक्यातून रक्त वाहत होते, गंभीर जखमा होत्या. प्रकृती चिंताजनक होती. त्यानंतर त्याचे सीटी स्कॅन करण्यात आले.
त्यात अतिरक्तस्त्रावामुळे डोक्याच्या दोन्ही बाजुला रक्ताच्या गुठळ्या जमा झाल्या होत्या. त्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु राजेशची आर्थिक परिस्थिती नाजुक असल्यामुळे कुटुंबीयांनी शस्त्रक्रिया करण्याचा खर्च उचलण्यासाठी असमर्थता दर्शविली. त्यानंतर लक्ष मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रमुख अस्थिरोग विशेषज्ञ डॉ.गोपाल व्यास यांनी राजेशचा जीव वाचविण्यासाठी आ.डॉ.परिणय फुके यांना रूग्णाची संपूर्ण परिस्थिती अवगत करून दिली. आ.फुके यांनी तत्परता दाखवत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शस्त्रक्रियेच्या खर्चाची सुविधा करून दिली.
यावेळेत डॉ.व्यास यांनी नागपूरचे न्युरो सर्जन डॉ.योगेश शेंडे यांच्याशी संपर्क करून चमूसह भंडारा येथे पोहोचले. त्यानंतर राजेशवर शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली.
डॉ.शेंडे यांच्या नेतृत्वात तीन तासांची शस्त्रक्रिया सायंकाळी ६ वाजता संपली. यावेळी अस्थिरोग विशेषज्ञ डॉ. गोपाल व्यास, अॅनेस्थेटिक सर्जन डॉ. प्रणाली शेंडे, डॉ.रूपेश दुरूगकर, डॉ. दीपक चितगिरे यांनी सहकार्य केले. याबाबत डॉ.व्यास यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, राजेशच्या डोक्यातील रक्ताच्या गुठळ्या हटविणे जिकरीचे काम होते. भंडारासारख्या छोट्या शहरात ही अवघड शस्त्रक्रिया होऊ शकते, असे विचार कुणीही केला नसेल.
परंतु ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर आता जटिल न्युरो सर्जरीसुद्धा भंडारा शहरात होऊ शकते, हे सिद्ध झाले आहे. आता हा रूग्ण अतिदक्षता विभागात असून आता तो सामान्यस्थितीत आहे. बोलतसुद्धा आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून सरकारच्या योजनेतून गरजू रूग्णांना आर्थिक मदत मिळाली तर आपात स्थितीत येणाऱ्या रूग्णांचे जीव वाचू शकतात, असे डॉ.व्यास यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.