अकाली पावसाचा फटका
By Admin | Published: May 29, 2017 12:11 AM2017-05-29T00:11:45+5:302017-05-29T00:11:45+5:30
शनिवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान झालेल्या पावसाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला.
ठिकठिकाणी नुकसान : दोन दिवस तूर खरेदी बंद, वृक्ष उन्मळली; वीजपुरवठा खंडित
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूरबाजार/ नांदगाव खंडेश्वर : शनिवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान झालेल्या पावसाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला. विशेष म्हणजे बाजार समितीमध्ये विक्रीस असलेली तूर भिजल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे.
नांदगावच्या बाजार समितीत नाफेडने खरेदी केलेली तूर ओलीचिंब झाली. अनेक शेतकऱ्यांच्या बाजार समितीच्या आवारात खुल्या मैदानात असलेल्या तुरीच्या गंजीखाली पाणी शिरल्याने शेतकऱ्यांनासुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसला. पावसामुळे दोन दिवस तूर खरेदी बंद असल्याने महिनाभरापासून तूर मोजणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आणखी दोन दिवस तूर मोजणीसाठी थांबावे लागणार आहे.
बाजार समितीत मोठ्या प्रमाणात तुरीची आवक वाढल्याने शेतकऱ्यांना जागेअभावी बाजार समितीच्या आवारात खुल्या मैदानात तूर ठेवावी लागली. ज्या तुरीच्या गंजींना ताडपत्रीने झाकून ठेवण्यात आले होते. अशा गंजीच्या खालून पानी वाहिल्याने नुकसान झाले.
चांदूरबाजार तालुक्यात लाखनवाडी, आसरा या गावांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. परिसरात वादळी पावसासह गारपीट झाली. वादळाचा वेग अधिक असल्याने नुकसान झाले. लाखनवाडी गावात नागरिकांच्या घरावरील टिनाचे पत्रे उडाले. विजेचे तार तुटून पडल्यामुळे विजपुरवठा खंडित झाला. विजेचे चार पोल व अनेक वृक्ष कोलमडून पडले. या घटनेची माहिती मिळताच नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी तलाठी, पोलीस पाटील व कोतवाल यांनी पीक नुकसानीचा पंचानामा केला. चांदूरबाजार तालुक्यात कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
भातकुली तालुक्यात वादळी पावसामुळे मोठी झाडे कोसळली व वीजपुरवठा खंडित झाला. तिवसा येथील बाजार समितीमध्ये ढगाळ वातावरणामुळे तूर मोजणी बंद करण्यात आल्याने व त्यावर ताडपत्री झाकून ठेवल्याने मोठे नुकसान टळले. मोशी तालुक्यात रात्री उशिरा पाऊस पडला. मात्र आसपासच्या परिसरात वादळी पावसाची माहिती मिळाल्याने नागरिक सजग होते.
कांदा पिकाला नुकसान
अकाळी पावसामुळे बाजार समितीच्या यार्डात ठेवलेल्या तुरीचे नुकसान झाले. शेतातील उभ्या कादा पिकाला याचा सर्वाधिक फटका बसला. कांद्याला भाव नसल्याने अनेक शेतकरी कांद्याची रस्त्यावर विक्री करीत आहेत. मात्र कांदा ओला झाल्याने तो सडण्याची शक्यता असून त्याचा भाव कमी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.