सिंचन सुविधांमुळे कोरडवाहू पट्ट्यात उसाची मुसंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:29 AM2021-01-09T04:29:44+5:302021-01-09T04:29:44+5:30
युवराज गोमासे करडी(पालोरा):- सिंचनाच्या साधनांमुळे दगडावरही चांगली शेती करता येते. ग्रामीण भागात ''''पाणी त्याची बाणी'''', असे म्हटले जाते. कोरडवाहू ...
युवराज गोमासे
करडी(पालोरा):- सिंचनाच्या साधनांमुळे दगडावरही चांगली शेती करता येते. ग्रामीण भागात ''''पाणी त्याची बाणी'''', असे म्हटले जाते. कोरडवाहू करडी परिसरात चार वर्षात जलसंधारणांच्या कामांमुळे आज परिस्थिती पालटली आहे. परिणामी उन्हाळ्यातील कोरडे माळरान आता हिरवेगार दिसू लागले आहेत. एका पाण्याचा दुष्काळ बऱ्याच अंशी संपला. जलस्रोतात व साठवणूक क्षमतेत तसेच भूजल साठ्यात वाढ होऊन धानाच्या पट्ट्यात आता उसाने दुपटीने मुसंडी मारली आहे. बागायती क्षेत्रातही वाढ झाली आहे.
कोरडवाहू करडी परिसरात २७ लहान मोठ्या तलावांची संख्या असताना सिंचन क्षमता बेताची होती. ''''जलयुक्त शिवार योजनेने यातील बहुतेक तलावांचे खोलीकरण चार वर्षात झाले. नविन बंधारे व तुटलेल्या बंधाऱ्यांची दुरूस्ती झाली. शेततळे खोदल्या गेले. नाल्यांचा उथळपणा निघून खोल झाले. जलसाठ्यात भरीव वाढ झाल्याने विहिरींची पाण्याची पातळी वाढल्याने उसाच्या क्षेत्रात दुपटीने वाढ झाली. हेक्टरी उत्पादन ६० ते ६५ टनांपर्यंत पोहचले आहे.
करडी परिसरात जिल्ह्यातील एकमेव मानस साखर कारखान्याच्या गाळप हंगामाला प्रारंभ झाला आहे. वैनगंगेच्या खोऱ्यात काळ्या कसदार सुपीक शेतीचे वरदान शेतकऱ्यांना मिळाले आहे. मात्र, सिंचनाच्या साधनांअभावी व पाण्याचे योम्य नियोजन, व्यवस्थापन तसेच साठवणुकी अभावी पावसाचे पाणी आले तसे नदीला, नाल्यांना वाहून जायचे. परिपक्व अवस्थेत आलेले धानाचे पीक एका पाण्याने वाया जायचे.
करडी परिसरातील गावात जलसाठवणुकीचे लघु व सूक्ष्म सिंचनाचे जाळे जलयुक्त शिवार योजनेमुळे विणले गेले. परिणामी गावात धानाशिवाय अन्य पिके घेतली जात नव्हती. परंतु सिंचनाची साधने निर्माण झाल्याने कोरडवाहू पालोरा, जांभोरा, किसनपूर, खडकी, पांजरा, बोरी, करडी, नवेगाव, मोहगाव आदी गावात चार वर्षात उसाच्या क्षेत्रात भरीव वाढ झाली. ड्रीप व मल्चींगवर आधारीत बागायती शेती क्षेत्रातही बाढ होताना दिसत आहे.
बॉक्स
ऊस क्षेत्रात अशी झाली भरीव वाढ
शासनाच्या जलयुक्त शिवार येजनेची मोठी साथ कोरडवाह पट्ट्यातील शेतकऱ्यांना मिळाली आहे. मोहाडी तालुक्यात सन २०१५-१६ ते २०१८-१९ या तीन वर्षात ३३ गावात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या काममुळे काटी पिकांना उपयुक्त साथ लाभली आहे. तालुक्यात सन २०१५-१६ मध्ये उसाचे क्षेत्र ४५० हेक्टर होते. २०१६-१७ मध्ये उसाच्या क्षेत्रात वाढ होऊन ती ६२३.४८ हेक्टर वर पोहचली तर सन २०१७-१८ मध्ये उसाचे क्षेत्र ८४.०७ हेक्टर आर पर्यंत पोहचले आहे. सन २०१८-१९ व २०१९-२० वर्षात वाढ कायम राहिली आहे.