गौरक्षण शाळेत होणार खत निर्मिती केंद्र
By admin | Published: September 14, 2015 12:23 AM2015-09-14T00:23:00+5:302015-09-14T00:23:00+5:30
चांदपूर येथील जागृत हनुमान देवस्थानात प्रथमत:च गौरक्षण शाळेची निर्मिती करण्यात आली आहे. आता या शाळेत खत निर्मिती केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.
स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित : जनावरांना मिळणार वर्षभर हिरवा चारा
चुल्हाड (सिहोरा) : चांदपूर येथील जागृत हनुमान देवस्थानात प्रथमत:च गौरक्षण शाळेची निर्मिती करण्यात आली आहे. आता या शाळेत खत निर्मिती केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या कार्यासाठी स्वतंत्र यंत्रणा क्रियान्वित करण्यात आली असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अजय खंगार व सचिव तुलाराम बागडे यांनी दिली.
चांदपूर येथील जागृत हनुमान देवस्थान परिसरात भक्तांसाठी ट्रस्ट व्यवस्थापन मंडळाच्या वतीने प्रथमत:च गौरक्षण शाळेची निर्मिती करण्यात आली आहे. भक्त भाविक या देवस्थानात श्रद्धेने गौमाता दान स्वरुपात देत आहे. या जनावरांचे संगोपन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. या कार्यात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जंगल शेजारी देवस्थान असल्याने हिंसक वन्य प्राण्यांचा मुक्त संचार आहे. गौरक्षण केंद्रातील जनावरांना सुरक्षा देण्यासाठी केंद्राला लोखंडी जाळी लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रात्री या जनावरांवर सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून निगराणी केली जाणार आहे. या देवस्थानात नवस फेडतांना जनावरे दान करण्याची परंपरा जुनीच आहे. आधी केंद्राची सोय नसल्याने निधी देण्याची परंपरा होती. परंतु यात भाविकांना समाधान होत नव्हते. त्यांची समस्या व श्रद्धा लक्षात घेवून गौरक्षण केंद्र स्थापन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. या केंद्रात जनावरांची संख्या वाढत असल्याने संगोपनासाठी एका कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्याला मानधन दिले जात आहे. या जनावरापासून प्राप्त होणाऱ्या शेणापासून खत निर्मिती केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या खताचा उपयोग परिसरातील शेतकऱ्यांना झाला पाहिजे, या करीता कृषी तज्ज्ञ तथा कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची मदत घेतली जणार आहे. देवस्थानातील गौरक्षण केंद्रातील जनावरांना वर्षभर हिरवा चारा प्राप्त होणार आहे. या शिवाय पिण्याचे पाणी समस्या निकाली निघणार आहे. या जनावराचे आजार आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. देवस्थान ट्रस्टच्या बैठकीत जनावरांना सुरक्षा देणार आहे. (वार्ताहर)