वैनगंगा नदी पुलावर जीवघेणे खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 10:11 PM2018-06-16T22:11:48+5:302018-06-16T22:12:04+5:30
तुमसर गोंदिया राज्य मार्गावर माडगी शिवारात वैनगंगा नदी पुलावरील रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर पुलावरील लोखंडी सळाखी उघड्या पडल्या आहेत. वाहने खचक्यावरून वर उसळतात. त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. रहदारीच्या पुलाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर गोंदिया राज्य मार्गावर माडगी शिवारात वैनगंगा नदी पुलावरील रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर पुलावरील लोखंडी सळाखी उघड्या पडल्या आहेत. वाहने खचक्यावरून वर उसळतात. त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. रहदारीच्या पुलाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
माडगी शिवारात वैनगंगा नदी पुलावर मोठे खचके सहा ते सात ठिकाणी पडले आहेत. उंच भाग वाहनधारकांना दिसत नाही. भरधाव वाहने या खचक्यावरून उसळी मारतात. वाहन अनियंत्रित होवून अपघातग्रस्त होण्याची येथे शक्यता आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांना यापूर्वी येथे अपघात घडले आहेत. या पुलावर तीन ते चार ठिकाणी खड्डे पडून पुलाच्या लोखंडी सळाखी उघड्या आहेत. हे खड्डे धोकादायक आहेत. दुचाकी व चारचाकी वाहन पंक्चर होवून अनियंत्रित होण्याची शक्यता येथे बळावली आहे. सदर पुल दुरुस्तीची निविदा प्रकाशित झाली. परंतु अजूनपर्यंत संबंधित कंत्राटदाराला कामाचे आदेश प्राप्त झाले नाही अशी माहिती आहे.
अतिशय वर्दळीचा हा मार्ग असून सदर पुलाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. कासवगतीने कागदोपत्री कामे येथे सुरु असून मोठ्या अपघाताचीे येथे संबंधित विभाग प्रतिक्षा करीत आहे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वैनगंगा पुलावरील दुरुस्ती कामांची निविदा मंजूर झाली आहे. या कामाचे आदेश लवकरच निघणार असून कामाला सुरुवात होणार आहे.
- पी.एन.माथुरकर,
कनिष्ठ अभियंता मोहाडी
माडगी शिवारातील वैनगंगा नदी पुलावर खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांसाठी हा मार्ग जीवघेणा ठरत आहे. बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची कामे केली नाही तर आंदोलन करण्यात येईल.
-के.के. पंचबुद्धे,
जि.प. सदस्य, देव्हाडी