तरूणाची हत्या करून आत्महत्येचा देखावा

By admin | Published: July 11, 2017 12:17 AM2017-07-11T00:17:33+5:302017-07-11T00:17:33+5:30

पवनी तालुक्यातील कोसरा येथील रहिवासी तथा भारत गॅस एजंसीचे संचालक प्रशांत उर्फ बाळू उदाराम देशमुख (३३) यांचा मृतदेह शेतशिवारतील एका विहिरीत आढळून आला.

The suicide scene by killing the young man | तरूणाची हत्या करून आत्महत्येचा देखावा

तरूणाची हत्या करून आत्महत्येचा देखावा

Next

कोसरा येथील घटना : संशयास्पद स्थितीत विहिरीत आढळला तरूणाचा मृतदेह
लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढा (कोसरा) : पवनी तालुक्यातील कोसरा येथील रहिवासी तथा भारत गॅस एजंसीचे संचालक प्रशांत उर्फ बाळू उदाराम देशमुख (३३) यांचा मृतदेह शेतशिवारतील एका विहिरीत आढळून आला. ही घटना सोमवारी सकाळी कोंढा परिसरातील एका शेतशिवारात उघडकीस आली. विहिरीजवळ चारचाकी वाहन आढळले असून त्यावर रक्ताचे डाग आढळले आहेत. प्राथमिक तपासाअंती त्यांची हत्या करून आत्महत्येचा देखावा निर्माण केल्याचे दिसून आले आहे.
प्रशांत देशमुख हे रविवारी सायंकाळपासून मालकीचे चारचाकी वाहन घेऊन घरून निघून गेले होते. सायंकाळी रात्री ८ वाजताच्या सुमारास प्रशांतने एका हॉटेलमध्ये जेवण केले. रात्रीपर्यंत घरी परत न आल्याने प्रशांतची आई सिंधू देशमुख यांनी प्रशांतचे मामा तथा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विजय काटेखाये यांना माहिती दिली. विजय काटेखाये, हे मृताचा भाऊ प्रमोद देशमुख व नातेवाईकांनी प्रशांतचा शोध घेतला. मात्र काहीच माहिती न मिळाल्याने रात्री उशिरा अड्याळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रशांतचा मोबाईलही बंद होता. सोमवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास काही लोकांना नर्सिंग कॉलेजजवळील शेतशिवारातील एका विहिरीजवळ चप्पल व क्वॉलीस वाहन दिसले. या विहिरीत काहींनी डोकावून पाहिले असता प्रशांतचा मृतदेह आढळून आला. याची माहिती पोलीस पाटलास देण्यात आली. त्यांनी पोलिसांना कळविले.
कोंढा येथील मुख्य मार्गावर अभिजित भारत गॅस सर्व्हिस या नावाने प्रशांतचे दुकान आहे. याशिवाय कोंढा व सेंद्री येथे रिलायन्स डेअरी आहे. स्वत: दुध संकलन करुन भंडारा येथे रिलायन्स डेअरीला दुध पुरवठा करण्याचे काम ते करीत होते. या घटनेचा तपास अड्याळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एन. ढोबळे हे करीत आहेत.

चारचाकी वाहनावर रक्ताचे डाग
प्रशांत देशमुख यांच्या मालकीचे चारचाकी (क्र.एम.एच. ३१ सी.एम. ५०४५) वाहन ढोल्याच्या विहिरीजवळ आढळले. वाहनाच्या बाहेरील दरवाजावर रक्ताचे डाग आहेत. वाहनाचे समोरील काच फुटलेले आहे. वाहनाच्या आतमध्ये प्रशांतचा मोबाईल होता. प्रशांतचा मृतदेह विहिरीबाहेर काढला त्यावेळी त्याच्या डाव्या हाताला नॉयलानची जवळपास दोन फुटांची दोरी बांधलेली होती. नाकावर जखमेचे व्रण होते. भंडारा येथून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. मात्र शोध लागला नाही. .

मृतकाच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहे. तसेच उत्तरीय तपासणी अहवालानंतरच सत्य उघडकीला येईल. अहवाल येईपर्यंत नेमके काहीही सांगता येणार नाही.
- एस. एन. ढोबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, अड्याळ

Web Title: The suicide scene by killing the young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.