तालुक्यात चार हजार हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धानाची रोवणी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:31 AM2021-03-15T04:31:28+5:302021-03-15T04:31:28+5:30
लाखांदूर : धान उत्पादनात अग्रेसर मानल्या जाणाऱ्या लाखांदूर तालुक्यात यंदाच्या रब्बी हंगामात इटिया डोह धरण व कृषी वीजपंपाच्या सिंचन ...
लाखांदूर : धान उत्पादनात अग्रेसर मानल्या जाणाऱ्या लाखांदूर तालुक्यात यंदाच्या रब्बी हंगामात इटिया डोह धरण व कृषी वीजपंपाच्या सिंचन सुविधेंतर्गत तालुक्यातील जवळपास चार हजार ५० हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धानाची रोवणी पूर्ण झाली आहे. तथापि सदर रोवणी अपेक्षित क्षेत्राच्या ५७ टक्के प्रमाणात असल्याची माहिती असून, काही क्षेत्रात भाजीपाला व ऊस पिकाची लागवडदेखील झाल्याची माहिती तालुका कृषी विभागांतर्गत देण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यातील जवळपास २८ हजार हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात आली होती. मात्र खरिपात तीनदा निर्माण झालेली पूरपरिस्थिती, तुडतुडा व अन्य कीडरोगासह परतीच्या पावसाने लागवडीखालील पिकाचे प्रचंड नुकसान होऊन उत्पादनात घट झाली आहे. सदर घट लक्षात घेता तालुका प्रशासनाने आणेवारीतदेखील कमालीची घट दाखवून तालुका दुष्काळग्रस्त जाहीर होण्याचा मार्ग सुकर केला आहे. मात्र आणेवारी जाहीर होऊन तब्बल दोन महिने लोटूनदेखील तालुका दुष्काळग्रस्त घोषित न झाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई काढण्यासाठी उन्हाळी धानासह अन्य पीक लागवड केल्याची माहिती आहे.
त्यानुसार यंदाच्या रब्बी हंगामात लाखांदूर तालुक्यात बाघ इटिया डोह धरण लाभक्षेत्र व कृषी वीजपंपाच्या साहाय्याने सिंचन करून जवळपास सहा हजार ९५० हेक्टर क्षेत्रात रोवणीसाठी आवश्यक उन्हाळी धान पऱ्ह्यांची (नर्सरी) लागवड करण्यात आल्याची माहिती आहे. सदर लागवडींतर्गत तालुक्यातील जवळपास सात हजार हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धान पिकाची रोवणी अपेक्षित असून, आतापर्यंत चार हजार ५० हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धानाची रोवणी पूर्ण झाली आहे.
दरम्यान, तालुक्यातील ९० हेक्टर क्षेत्रात भाजीपाला पिकाची तर १५ हे. क्षेत्रात खोडवा ऊस पिकाची लागवड करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. तथापि तालुक्यात उन्हाळी धान रोवणी पूर्ण झालेल्या जवळपास १५० हेक्टर क्षेत्रात पट्टा पद्धतीने रोवणी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. एकंदरीत खरिपातील नुकसानभरपाई काढण्यासाठी रब्बी हंगामात उन्हाळी धानासह अन्य पिकांची लागवड करण्यात आली असली तरी संभाव्य कीडरोगाच्या भीतीने शेतकऱ्यात आर्थिक चिंतेचे वातावरण दिसून येत असल्याचे बोलल्या जात आहे.