रखरखत्या उन्हात रोजगार हमी कामांना सुरूवात
By admin | Published: April 20, 2017 12:41 AM2017-04-20T00:41:36+5:302017-04-20T00:41:36+5:30
वितभर पोटाची खडगी भरण्यासाठी मजुरांची भटकंती होते. यामुळे कुटुंबापासून कधी दूर जावे लागते.
शेतीच्या कामाला मिळेना मजूर : पालांदुरात ५८६ मजुरांची कामावर उपस्थिती
मुखरु बागडे पालांदूर
वितभर पोटाची खडगी भरण्यासाठी मजुरांची भटकंती होते. यामुळे कुटुंबापासून कधी दूर जावे लागते. अशात राज्य शासनाच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामांना आता गावात सुरूवात झाली आहे. उन्हाच्या प्रखरेतेत अंगाची काहिली होत असली तरी, पोटासाठी शेकडो मजुरांनी हातात फावडे, घमेले घेऊन रोहयोच्या कामावर हजेरी लावली.
रोहयोत वर्षभरात १०० दिवस मजुरांना काम देण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे. रविवारपासून पालांदूरात रोजगार हमी सुरू झाली असून पहिल्या दिवशी ५८६ तर दुसऱ्या दिवशी ५८४ मजुरांच्या उपस्थितीची नोंद हजेरी सहायकांनी नोंदविली.
रब्बी हंगामानंतर मजुरांना शेतीची कामे अपूरी असतात. पर्यायाने अल्प मजुरांना काम शेतकरी स्वत:च्या शेतात देतो. या व्यवस्थेचा ग्रामीण भागात संधीचा अभाव असल्याने मजूर रिकामे राहतात. रोजगार हमीमुळे निदान १०० दिवस तरी मजुरांना काम मिळते. १०० दिवसाचा सदुपयोग योग्य दिशेने होताना दिसत नसल्याचे वास्तव ग्रामीण भागात पहायला मिळते.
नाला सरळीकरण, पांदणरस्ते, तलाव खोलीकरण सारखे कामे घेत मजुरांच्या हाताला काम पुरविले जाते. मात्र दरवर्षी तेच तेच काम होत असल्याने कामाचे फलित योग्य दिशेने होत नाही. नाली सरळीकरण खडक किंवा रेतीमाती काठावर फेकणे व एक पाऊस आला की तिच रेतीमाती पुन्हा त्याच नाल्यात पडणे, ही नित्याची बाब सगळ्यांच्या लक्षात येते. पंरतू कामाचे नियोजन होत नसल्याने व नविन कामे रोजगार हमीत समाविष्ठ नसल्याने निरूपायाने तेच कामे करावी लागतात.
पालांदुरात रोजगार हमी अंतर्गत ग्रामीण रूग्णालयापासून पोलीस ठाण्याच्या पुढील रस्त्याच्याकडेला काम सुरू आहे. मातीकाम असल्याने पाट तर दोन्ही बाजुला माती फेकल्या जात आहे. त्या मातीला योग्य न्याय मिळत नसल्याची चर्चा होत आहे. पावसाळ्यात हा पाट पुन्हा जैसे थे च होईल व नाहक काम व पैसा वाया जाईल असा सूर जनसामान्यातून निघत आहे.
काम करतेवेळी जबाबदार पदाधिकारी हजर राहत नाही. यामुळे कामाला योग्य न्याय मिळत नाही. ४.२३ लक्षाचे खर्चाचे नियोजन असून किती दिवस काम पुरविल्या जाईल. याकडे मजुरांचे लक्ष लागले आहे. रोजगार हमी योजनेच्या कामांचा आरंभ होताच शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली असून शेतीकामाला मजुर मिळत नाही.
शेतीची संपूर्ण कामे रोजगार हमीतून केली गेली तर मजुर व शेतकरी दोघानाही शासनाच्या योजनेचा लाभ होईल व दोघांच्याही डोक्यावरील ताण कमी होईल तेव्हा मजूर टंचाई आ वासून उभी असेल. मागील वर्षाला जिल्ह्यात १२ हजार ३९३ मजुरांच्या हाताला रोहयोचे कामे मिळाली होती, हे विशेष.