उन्हाळ्यात पाणीटंचाईचा करावा लागणार सामना
By admin | Published: December 30, 2015 01:34 AM2015-12-30T01:34:43+5:302015-12-30T01:34:43+5:30
यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे प्रकल्प, तलाव व बोड्यांमध्ये पाणी साठा झालाच नाही.
प्रकल्पात जलसाठा अत्यल्प : संभाव्य पाणी टंचाईवर उपाययोजनेची गरज
संजय साठवणे साकोली
यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे प्रकल्प, तलाव व बोड्यांमध्ये पाणी साठा झालाच नाही. तर जमलेला जलसाठाही आता कमी झाला आहे. सद्यस्थितीला प्रकल्पात व तलावात फक्त १५ ते २० टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे यावर्षी उन्हाळ्यात जिल्हावासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार हे नाकारता येत नाही. प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना करण्याची गरज आहे.
जिल्ह्यात एकूण लघु प्रकल्प ३१ आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे. ३१ लघुप्रकल्पात सद्यस्थितीला जलसाठा हा २५ टक्के आहे. तर जुन्या माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा हा २९.९४ टक्के आहे. जिल्ह्यातील ३१ लघु प्रकल्पामध्ये तुमसर तालुक्यातील कुरघडा, कवलेवाडा, पवनारखारी, आंबागड, परसवाडा, डोंगरला, कारली, साकोली तालुक्यातील शिवणीबांध, कुंभली, गुडरी, लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी तर लाखनी तालुक्यातील भूगाव मेंढा, मुरमाडी, रेंगेपार, कोढा, न्याहारवानी, वाकल, खुर्शीपार, मोहाडी तालुक्यातील नागठाणा, टांगा, हिवरा, भंडारा तालुक्यातील आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, रावणवाडी, सिल्ली, आंबाडी, पवनी तालुक्यातील वाही, भिवखिडकी, कातुर्ली, पिलांद्री यांचा समावेश आहे.
हिवाळ्यात पाणीटंचाईचे संकेत दिसत असून येत आहेत. जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्पसाठा आहे. शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे यावर्षी उन्हाळी धानपिक कसे काय होणार? जनावरांना पिण्याचे पाणी मिळणार काय? असा प्रश्न आहे. यावर्षी अत्यल्प पावसामुळे प्रकल्पात पाहिजे त्या प्रमाणात जलसाठा झाला नाही. जो जलसाठा होता त्या पाण्याचा वापर शेतकऱ्यांनी शेतीसाठी व इतर कामासाठी केला. त्यामुळे ऐन हिवाळ्यात प्रकल्पात जलसाठा निरंक आहे. बेटेकर बोथली, सोरणा, पवनारखारी, हिवरा, आमगाव, डोडमाझरी, मालीमार, चिखलपहेला, डोंगरगाव, एकलाझरी, जांभोरा व कोका या १२ प्रकल्पामधील पाणीसाठा निरंक आहे.