सुंदरटोला येथे चुली पेटल्याच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 10:18 PM2017-09-04T22:18:47+5:302017-09-04T22:19:12+5:30

गावाशेजारील तलावात कमळाची फुले तोडण्याकरिता गेलेल्या दोन बहिणीसह भावाचा रविवारी सायंकाळी तलावात बुडून करुण अंत झाला.

The Sunderto did not burn here | सुंदरटोला येथे चुली पेटल्याच नाही

सुंदरटोला येथे चुली पेटल्याच नाही

Next
ठळक मुद्देहुंदके अन् आक्रोशाने सुंदरटोल्यात स्मशान शांतता : शोकाकूल वातावरणात तिन्ही भावंडांवर अत्यंसंस्कार

मोहन भोयर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : गावाशेजारील तलावात कमळाची फुले तोडण्याकरिता गेलेल्या दोन बहिणीसह भावाचा रविवारी सायंकाळी तलावात बुडून करुण अंत झाला. मृत भावंडांवर सोमवारला दुपारी २ वाजताच्या सुमारास शोकाकूल वातावरणात सुंदरटोला येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
रविवारी सायंकाळी ५.३० वाजता मुस्कान धनराज सरीयाम (११), प्रणय धनराज सरीयाम (६) व सारिका छबीलाल सरीयाम (१०) यांचा गावाजवळील तलावात बुडून मृत्यू झाला. तलावात जाण्यापूर्वी तिघेही भावंड घरासमोरील अंगणात खेळत होते. खेळताखेळता ते तलावाकडे निघाले. सरीयाम कुटूंबीयांचे घर तलावापासून केवळ १०० मीटर अंतरावर आहे. प्रथम तिघांही भांवडानी कपडे काढले. तलावात शिल्यावर लहान भाऊ प्रणय सर्वात पुढे होता. तलावातील खड्यात तो गंटागळ्या खाताना दोन्ही बहिणींनी बघताच त्याला वाचविण्याकरिता त्या धावल्या. एकापाठोपाठ तिघेही भावंड गटांगळ्या खात पाण्यात बुडाले.
सायंकाळी तलावाकडे जाताना स्थानिक नागरिकांनी त्यांना बघितले होते. सायंकाळी तिन्ही भावंड घरी न दिसल्याने शोधाशोध सुरु झाली होती. तलावाच्या काठावरील कपड्यावरुन त्यांची ओळख पटली. गावातील युवकांनी शोधमोहीम राबवून त्यांना बाहेर काढले. परंतु बराच उशिर झाला होता. रविवारी सायंकाळी व सोमवारी सुंदरटोलात स्मशानशांतता पसरली होती.
तीन भावंडाच्या मृत्यूमुळे संपूर्ण सुंदरटोल्यावर शोककळा पसरली होती. रविवारी सुंदरटोल्यात चुली पेटल्या नाही. रात्री तिघांचे मृतदेह तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. सोमवारी दुपारी १२ वाजता त्यांचे शवविच्छेदन पोहचताच मुस्कान, सारीका व प्रणय च्या आई वडील व कुटूंबियांनी एकच हंबरडा फोडला तेव्हा उपस्थितांनाही अश्रू आवरता आले नाही. कुटूंबीय चिमुकल्यांच्या आठवणींना उजाळा देत ओक्साबोक्सी रडत होते. खेळता खेळता तलावाकडे कसे गेले हाच प्रश्न त्यांच्या तोंडून अनेकदा उच्चारला गेला.
मुस्कान ही तुमसर येथील जनता शाळेत इयत्ता पाचवीत शिकत होती. अभ्यासात ती अतिशय हुशार होती असे शिक्षकांनी सांगितले. सारीका ही इयत्ता चवथीत तर प्रणय सुंदरटोला येथील जिल्हा परिषद शाळेत शिकत होते. संपूर्ण सुंदरटोला येथे आक्रोश, हुंदके कानी पडत होते. तिन्ही भावंडाचे आई व वडील नि:शब्द झाले होते.
गावात गणपती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो, पंरतु सरीयाम कुटूंबावरील शोककळेने गणपवती उत्सवावर विरजन पडले. नियमित शाळेत जाणारी मुस्कान आपल्यात आज नाही यावर वर्गमित्राचा प्रथम विश्वासच बसला नाही. रविवार नसता तर मुस्कान नक्कीच शाळेत हजर असती अशा प्रतिक्रीया विद्यार्थीनीनी व्यक्त केल्या. सुंदरटोला येथील तलावात खड्डे पडले आहेत. त्या खडड््यानीच तिन्ही भावंडाचा जीव घेतल्याची प्रतिक्रिया उमटत होती.
शिक्षकांकडून आर्थिक मदत
जनता विद्यालयात शिकणाºया मुस्कान सरीयामच्या कुटुंबाला शिक्षकांनी १० हजारांची आर्थिक मदत दिली. सोमवारी सुंदरटोला शाळेतील अनेक शिक्षकांची उपस्थिती होती. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचाही त्यात समावेश आहे. सौजन्य म्हणून कोणतेही अधिकारी येथे आले नाही. केवळ तलाठी उपस्थित होते. तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक उईके, जिल्हा परिषद सदस्य के. के. पंचबुध्दे, चिखलाचे सरपंच दिलीप सोनवाने, माजी नगरसेवक लक्ष्मीकांत सलामे, अनिल टेकाम, माजी पं.स. सदस्य प्रभा पेंदामसह पदाधिकाºयांनी भेट दिली होती. आदिवासींच्या मुलांचा मृत्यू झाला. यापूर्वी समिती प्रमुख जिल्हास्तर होते. सध्या ते पद रिक्त असल्याने आकस्मीक निधी म्हणून यापूर्वी १० हजारांची आर्थिक मदत केली जात होती. परंतु ती मदत सरियाम कुटुंबाला मिळाली नाही. असा आरोप अशोक उईके यांनी केला. मृत बालकांच्या कुटुंबियाला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी चिखला येथील सरपंच दिलीप सोनवाने, माजी जि.प. सदस्य अशोक उईके, माजी नगरसेवक लक्ष्मीकांत सलामे, माजी पं.स. सदस्य प्रभा पेंदाम व अनिल टेकाम यांनी केली आहे.

Web Title: The Sunderto did not burn here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.