नगराध्यक्षपदी सुनील मेंढे आरूढ
By Admin | Published: February 8, 2017 12:46 AM2017-02-08T00:46:21+5:302017-02-08T00:46:21+5:30
तब्बल दीड महिन्यापूर्वी भंडारा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक पार पडल्यानंतर भाजपचे सुनील मेंढे यांनी ...
उपाध्यक्षपदी रूबी चढ्ढा : स्वीकृत सदस्यपदी भाजपकडून मंगेश वंजारी, चंद्रशेखर रोकडे तर राकाँकडून बाबुराव बागडे
भंडारा : तब्बल दीड महिन्यापूर्वी भंडारा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक पार पडल्यानंतर भाजपचे सुनील मेंढे यांनी आज (मंगळवार) ठरल्याप्रमाणे आज दुपारी २.३० वाजता मावळते नगराध्यक्ष बाबुराव बागडे यांच्याकडून नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारला. यानंतर न.प. उपाध्यक्ष तथा तीन स्वीकृत सदस्यपदासाठी निवडणूक पार पडली. यात अविरोधपणे उपाध्यक्षपदी राकाँतून भाजपात आलेले कवलजितसिंह (रूबी) चढ्ढा यांची निवड करण्यात आली.
सकाळ सत्रात भाजपकडून आयोजित पदग्रहण सोहळा पार पडल्यानंतर अधिकृतरित्या नगर पालिकेत नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील मेंढे पदभार ग्रहण करणार होते. दुपारी २.१५च्या सुमारास सुनील मेेंढे यांच्यासह भाजपचे १५, राष्ट्रवादी काँग्रेसचे ११, काँग्रेसचे ३ तर अपक्ष म्हणून निवडून आलेले चारही सदस्य नगर पालिकेत उपस्थित झाले. नगराध्यक्षांच्या दालनात मुख्याधिकारी अनिल अढागळे यांच्या मुख्य उपस्थितीत सुनील मेंढे यांनी मावळते नगराध्यक्ष बागडे यांच्याकडून पदभार स्विकारला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी, तुमसरचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांच्यासह निवडून आलेले सर्व नगरसेवक उपस्थित होते. ३३ सदस्यीय भंडारा नगर पालिकेत भाजपचे १५, राष्ट्रवादीचे ११, काँग्रेसचे ३ आणि अपक्ष चार असे पक्षीय बलाबल आहे.
नगर परिषद निवडणूक निकालानंतर अपक्ष रजनीश मिश्रा, दिनेश भुरे, कल्पना व्यास यांनी भाजपला समर्थन दिले आहे. नवनिर्वाचित नगरसेवक तथा काँग्रेसचे गटनेते शमीम शेख, अब्दुल मालाधरी आणि जयश्री बोरकर यांनीही शहराच्या विकासासाठी भाजपला समर्थन देत असल्याचे पत्र नगराध्यक्ष मेंढे यांना दिले आहे. यानंतर दुपारी ३ वाजता मुख्याधिकारी यांनी उपाध्यक्ष तथा तीन स्विकृत सदस्यपदासाठी निवडणूक घेतली. यात भाजपकडून एकमेव रूबी चढ्ढा यांनी अर्ज सादर केल्याने त्यांना निर्विरोध नगर पालिका उपाध्यक्षपदी निवडून आल्याचे जाहिर करण्यात आले. अध्यक्षपदी आरूढ होण्यापूर्वी सुनील मेंढे यांनी महात्मा गांधी यांना माल्यार्पण करून अभिवादन केले. निडणुकनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. (प्रतिनिधी)
स्वीकृत सदस्यपदाची निवडणूक
भंडारा नगर पालिकेच्या एकूण ३३ नगर सेवक आहेत. यात १० सदस्यांना एक स्विकृत सदस्य म्हणून निवड करायची होती. परिणामी आज तीन सदस्यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली. अध्यक्षांचे पदग्रहण व उपाध्यक्ष निवडणुकीनंतर तीन स्वीकृत पदांसाठी निवडणूक घेण्यात आली. भाजपकडून चंद्रशेखर रोकडे व मंगेश वंजारी तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाबुराव बागडे यांनी अर्ज सादर केल्याने या तिघांचीही निर्विरोध स्वीकृत सदस्य पदावर निवड करण्यात आली.
नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास नगर पालिकेची प्रथम सभा घेण्यात आली. अध्य़क्षस्थानी नगराध्यक्ष सुनील मेंढे, उपाध्यक्ष रूबी चढ्ढा व मुख्याधिकारी अनिल अढाग़ळे यांच्यासह सर्व नगरसेवक कर्मचारी उपस्थित होते. सार्वत्रिक निवडणुकीनंतर पालिका पदाधिकाऱ्यांची पहिलीच सभा असल्याने नगराध्यक्षांसह सर्व सदस्यांचा परिचय करून घेण्यात आला. नगराध्यक्ष मेंढे यांनी स्व:त सर्व नगरसेवकांना गुलाबपुष्प देवून स्वागत केले. यावेळी मेंढे यांनी विकासकामात सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.