कृषी कार्यालयाला औषधांचा पुरवठा
By admin | Published: October 12, 2015 01:13 AM2015-10-12T01:13:00+5:302015-10-12T01:13:00+5:30
धान पिकावरील किडींचा नायनाट करणाऱ्या उपाययोजनांचे संदेश शेतकऱ्यांचे भ्रमणध्वनीवर येत असताना प्रत्यक्षात कृषी विभागात औषध उपलब्ध केले जात नाही.
चुल्हाड (सिहोरा) : धान पिकावरील किडींचा नायनाट करणाऱ्या उपाययोजनांचे संदेश शेतकऱ्यांचे भ्रमणध्वनीवर येत असताना प्रत्यक्षात कृषी विभागात औषध उपलब्ध केले जात नाही. या आशयाचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित होताच सिहोऱ्यांच्या मंडळ कृषी कार्यालयात औषधांचा पुरवठा करण्यात आलेला आहे.
वैनगंगा आणि बावनथडी नद्यांच्या खोऱ्यात असलेल्या सिहोरा परिसरात खरीप व रबी हंगामात धानाचे प्रमुख पीक घेतले जात आहे. या शिवाय नदी काठालगत शेतकरी भाजीपाला उत्पादन घेण्याकडे भर देत आहे. या शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान, मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र मंडळ कृषी कार्यालय आहे. परंतु हा कार्यालय अद्याप हायटेक करण्यात आलेला नाही. पाणलोट तथा अन्य शेतीपयोगी कामे व मार्गदर्शनाची जबाबदारी असताना मनुष्यबळाचा अभाव या कार्यालयाला अडचणीचे ठरत आहे. ७३ गावांची धुरा सांभाळणाऱ्या सिहोऱ्यातील मंडळ कृषी कार्यालयाने गेल्या महिनाभरात स्थानांतरणावरून कटुसत्य अनुभवले आहे. दरम्यान्, शेतकऱ्यांचे भ्रमणध्वनीवर पाऊस, संपर्क तथा धान आणि भाजीपाला लागवडीवर लागणाऱ्या किडींचा नायनाट करण्यासाठी उपायांचे संदेश दिले जात आहेत. नानाविध फॉम्युर्ले सांगितली जात असताना हक्काच्या मंडळ कृषी कार्यालयात औषधांचा पुरवठा करण्यात येत नाही. यामुळे शेतकरी सैरवैर औषधांच्या शोधासाठी खासगी कृषी केंद्रावर धाव घेत आहे. यात शेतकरी भरडल्या जात असताना लोकप्रतिनिधी दातखिळी बसली असल्याचा अनुभव शेतकरी घेत आहेत.
शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेणारे दोन विभाग असताना शेतकरी नागवला जात आहे. विकासावर योजनांचा पाऊस पडत नाही. तर योजना दारात पोहचत नाही. अनेक योजना आपुलकीच्या नादात 'लंब्या' होत आहेत.
ही बाब आणि शेतकऱ्यांची कैफीयत लोकमतने वृत्तात मांडली आहे. या वृताची दखल घेत सिहोऱ्यांच्या मंडळ कृषी कार्यालयात क्लीनीलफास, क्लोरोपायरीफास, कार्बोन्डाइझेस या औषधांचा प्रात्यक्षिकेसाठी पुरवठा करण्यात आलेला आहे. या औषधी शेतकऱ्यांना वाटप सुरु झाले असून सिहोरा परिसरात शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. (वार्ताहर)