'बालभारती'कडून भंडारा, पवनी, लाखांदूर व तुमसर तालुक्यांना पाठ्यपुस्तकांचा पुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 03:52 PM2024-05-19T15:52:47+5:302024-05-19T15:54:02+5:30
उर्वरित पुरवठा लवकरच; ८६,८९४ विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशीच मिळणार पुस्तके
देवानंद नंदेश्वर, भंडारा : समग्र शिक्षा अभियानांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या जिल्ह्यातील तब्बल ८७,८९४ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके हातात पडतील, असे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. आतापर्यत 'बालभारती'कडून भंडारा, पवनी, लाखांदूर व तुमसर तालुक्यांना पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला असून उर्वरित पुरवठा लवकरच होणार आहे. जिल्ह्यातील ८६,८९४ विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशीच पुस्तके वितरीत करण्यात येतील.
जिल्ह्यातील शासकीय, आश्रमशाळा, खासगी अनुदानित शाळा तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दरवर्षी पाठ्यपुस्तके वितरित केली जातात. यंदाही शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजे पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती पडावीत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे ८७ हजार ८९४ इतके विद्यार्थी आहेत. सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वेळेवर मिळण्यासाठी नियोजन असल्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वर्षा बेले यांनी सांगितले. यावर्षी एकात्मिक स्वरूपात पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहेत. एकाच संचामध्ये इंग्रजी, गणित यासह इतर विषय असणार आहेत. ही पुस्तके इंग्रजी माध्यमाच्या स्वंयअर्थसाहाय्यित शाळा सोडून इतर सर्व शाळांना वितरित केले जाणार आहेत, अशी माहिती शिक्षण विभागातून देण्यात आली.
तालुकानिहाय विद्यार्थी - पुस्तकांची संख्या - तालुका लाभार्थी पुस्तकांची मागणी
- भंडारा - १७७३५ - ७४१२९
- लाखांदूर - १०२४३ - ४२१७८
- लाखनी - ११०५० - ४६०००
- मोहाडी - १०९०८ - ४५३१७
- पवनी - १२४४५ - ५१७४४
- साकोली - १०२०२ - ४२५४७
- तुमसर - १५३११ - ६३७४१
एकूण - ८७८९४ - ३६५६५६
बालभारतीकडून झाला पुस्तक पुरवठा
पाठ्यपुस्तकाचे संच नागपूर येथील बालभारती कार्यालयातून भंडारा जिल्ह्यातील चार तालुक्यांना १५ मे पासून पुरवठा करण्यात आले आहेत. उर्वरित तीन तालुक्यांना लवकरच पुरवठा केला जाणार आहे. या पाठ्यपुस्तके जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे येत आहेत. गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे पुस्तके स्वाधीन केल्यानंतर पुस्तकांचे तालुकास्तरावर प्रत्येक शाळेत वाटप करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.