राशन दुकानातून निकृष्ट दर्जाच्या तांदळाच्या पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:41 AM2021-09-24T04:41:41+5:302021-09-24T04:41:41+5:30

तुमसर : तालुक्यात गत तीन महिन्यांपासून राशन दुकानातून अतिशय निकृष्ट दर्जाच्या पिवळसर, काळसर तांदळाचे वितरण करणे सुरू आहे. ...

Supply of substandard rice from ration shop | राशन दुकानातून निकृष्ट दर्जाच्या तांदळाच्या पुरवठा

राशन दुकानातून निकृष्ट दर्जाच्या तांदळाच्या पुरवठा

Next

तुमसर : तालुक्यात गत तीन महिन्यांपासून राशन दुकानातून अतिशय निकृष्ट दर्जाच्या पिवळसर, काळसर तांदळाचे वितरण करणे सुरू आहे. हा तांदूळ तीन ते चार वर्षे जुना असल्याचे सांगण्यात येत आहे. शासनाच्या आदेशानुसार नवीन तांदळाचे वितरण करणे आवश्यक असताना नियमबाह्यपणे तांदूळ वितरित करण्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे. जनावारेही तोंड लावणार नाहीत असा निकृष्ट तांदूळ वितरित केला जात असल्याचे गावकरी सांगत आहेत.

महाराष्ट्र शासन व प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनाअंतर्गत शासकीय स्वस्त धान्य दुकानातून दोन व तीन रुपये किलो, तसेच विनामूल्य तांदूळ राशन कार्डधारकांना वितरित करण्यात येतो. तीन महिन्यांपासून तुमसर तालुक्यात स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट दर्जाचा तांदूळ देण्यात येत आहे. रुपेरा येथे निकृष्ट दर्जाचा तांदूळ वितरित करण्याचा प्रकार सुरू असल्याने लाभार्थ्यात रोष निर्माण झाला आहे. या तांदळाला गुरेसुद्धा खात नाहीत, असे गावकरी सांगत आहेत.

तुमसर व मोहाडी तालुक्यातील सुमारे १७ ते १८ राईस मिलधारक तांदळाचा पुरवठा करतात. येथील गोदामात ११६ लॉट तांदळाचे आले होते. त्यापैकी १७ लॉट बाद ठरविण्यात आले. याची संख्या सुमारे नऊ हजार पोती आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निकृष्ट तांदूळ कुठून येतो हा संशोधनाचा विषय आहे. तांदूळ तपासण्याची जबाबदारी निरीक्षण अधिकाऱ्याची आहे. याकरिता शासनाने राजपत्रित अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. गोदामात तांदूळ आल्यानंतर ती पाहण्याची जबाबदारी निरीक्षण अधिकाऱ्याची असते. निरीक्षण केल्यानंतरच तांदूळ राशन दुकानात जातो. त्यामुळे निरीक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

बॉक्स

नवीन तांदळाचा पुरवठा करण्याचा आदेश

राज्य शासनाने स्वस्त धान्य दुकानात विक्री करणाऱ्या येणारा तांदूळ हा नवीनच तांदूळ असावा असा आदेश काढला आहे; परंतु येथे नवीन तांदळासोबतच जुन्या तांदळाचा पुरवठा करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे तांदूळ पुरवठा व वितरणात गौडबंगाल असल्याचे दिसून येते. स्वस्त धान्य दुकानात पुरवठा करण्यात आलेला तांदूळ जर निकृष्ट असेल तर स्वस्त धान्य दुकानदारांनी पुरवठा अधिकाऱ्यांना माहिती द्यावी, असे सांगण्यात येते. मात्र, स्वस्त धान्य दुकानदार अशा प्रकारची माहिती सांगत नाहीत. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या चार जिल्ह्यांत हे चार जिल्हे धान उत्पादक जिल्हे म्हणून प्रसिद्ध आहेत. या जिल्ह्यातील तांदूळ स्थानिक गावखेड्यात, तसेच संपूर्ण महाराष्ट्रात वितरित करण्यात येतो. त्यामुळे या तांदळाचे निरीक्षण व चौकशी करण्याची गरज आहे.

बॉक्स

चौकशीत मोठे मासे गळाला लागणार

शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावरील धानाची उचल करून ती मिलर्स यांना देण्यात येते. मिलर्सकडून तांदूळ शासकीय गोदामात जातो. त्यानंतर स्वस्त धान्य दुकानातून हे तांदूळ वितरित करण्यात येते. शासकीय धान खरेदी केंद्रातील धान हे चालू हंगामातील असतात; परंतु स्वस्त धान्य दुकानात वितरित करणारे तांदूळ मात्र हे तीन ते चार वर्षे जुने आहेत. त्यामुळे ते कोठून आणले जातात याची चौकशी केली तर मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. निकृष्ट तांदूळ बदलून देण्याची भाषा अधिकारी करतात; परंतु याची योग्य ती चौकशी करून दोषीवर कारवाई कोण करणार असा प्रश्न उपस्थित आहे.

कोट

शासकीय स्वस्त धान्य दुकानात वितरित करण्यात येत असलेला तांदूळ निकृष्ट असेल तर त्यांनी थेट माझ्याकडे तक्रार करावी. निकृष्ट तांदूळ बदलून देण्यात येईल.

- बाळासाहेब तेळे, तहसीलदार, तुमसर.

Web Title: Supply of substandard rice from ration shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.