आश्चर्य! पालांदूर परिसरात कृषिपंपांना चोवीस तास वीजपुरवठा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2022 05:00 AM2022-04-13T05:00:00+5:302022-04-13T05:00:42+5:30
महावितरण उन्हाळ्यात विजेचे नियोजन करण्यात अपयशी ठरत आहे. कुठे आठ तास तर कुठे २४ तास तर कुठे १६ तास विजेचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे सर्व वीजग्राहकांना समान न्याय मिळत नाही. विजेची तूट निर्माण झाल्यास समायोजनच्या नावाखाली मात्र सर्वांनाच वीज दरवाढीचा शॉक दिला जातो. संकट उभे झाले की शासनाकडे बोट दाखविला जातो. मात्र, स्वतःच्या उत्पन्नावर नियोजन अजून तरी ‘महावितरण’ने केलेले दिसत नाही.
मुखरू बागडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : अख्ख्या महाराष्ट्रात विजेच्या भारनियमनाने भाजून निघत आहे. शेतीला अधिकृत आठ तास वीज देणे महावितरणला अडचणीचे होत आहे; परंतु गावठाणाला जोडलेल्या कृषीपंपांमुळे पालांदूर परिसरातील कृषीपंपांना २४ तास वीजपुरवठा होत आहे. गत तीन वर्षांपासून हा प्रकार सुरू असून २४ तास वीजपुरवठ्याने घरगुती विहिरींनी तळ गाठून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
महावितरण उन्हाळ्यात विजेचे नियोजन करण्यात अपयशी ठरत आहे. कुठे आठ तास तर कुठे २४ तास तर कुठे १६ तास विजेचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे सर्व वीजग्राहकांना समान न्याय मिळत नाही. विजेची तूट निर्माण झाल्यास समायोजनच्या नावाखाली मात्र सर्वांनाच वीज दरवाढीचा शॉक दिला जातो. संकट उभे झाले की शासनाकडे बोट दाखविला जातो. मात्र, स्वतःच्या उत्पन्नावर नियोजन अजून तरी ‘महावितरण’ने केलेले दिसत नाही. पालांदूर येथील सुमारे ४० कृषीपंप गाव फिडरवर आजही जोडलेले आहेत. गावठाणाला जोडलेल्या कृषिपंपांना २४ तास थ्री फेस वीज पुरविली जात आहे. त्यामुळे शेतकरी पाण्याच्या नियोजनाने अधिकची शेती उत्पन्नाखाली आणत आहे. एक पंप चार एकरापर्यंत शेतीचे सिंचन करतो आहे. त्यामुळे पाण्याचा उपसा सर्वाधिक होऊन गावातील घरगुती विहिरींनी तळ गाठलेला आहे. नळ योजना असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या नाही. मात्र, इतर कामांसाठी स्वतंत्र विहिरीतील पाणी उन्हाळ्याच्या दिवसात मिळत नाही. कित्येक कुटुंब २४ तास विजेच्या पुरवठ्यामुळे विहिरी कोरड्या करून बसले आहेत.
वीज वितरणच्या नियोजनातील त्रुटी
- एकीकडे भारनियमनामुळे कृषीपंपांना वीज मिळणे कठीण झाले आहे. तर दुसरीकडे पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांना २४ तास कृषीपंपाला वीज मिळत आहे. ही समाधानाची बाब असली तरी अतिरिक्त पाणी उपसामुळे गावातील विहिरींनी तळ गाठला आहे. वीज वितरण कंपनीने केलेले नियोजन येथे अपयशी ठरल्याने गावात मात्र पाणी टंचाई निर्माण झाली.
गावठाण फिडरवरून कृषी फिडर मोकळे करण्यासाठी पाठविलेले नियोजन मंजूर झालेले आहे. त्या वर्कऑर्डरसुद्धा झालेली आहे. किमान महिनाभरात कृषी फिडर गाव फिडर वरून वेगळे करण्यात येईल.
-मयंक सिंग, सहाय्यक अभियंता, पालांदूर.
गावठाण फिडरवरून कृषी फिडर मोकळे करण्यासाठी पाठविलेले नियोजन मंजूर झालेले आहे. त्या वर्कऑर्डरसुद्धा झालेली आहे. किमान महिनाभरात कृषी फिडर गाव फिडर वरून वेगळे करण्यात येईल.
-मयंक सिंग, सहाय्यक अभियंता, पालांदूर.