घरकूल लाभार्थ्यांकडून होणारी लूट थांबविण्यासाठी खंडविकास अधिकाऱ्यास घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:49 AM2021-02-26T04:49:10+5:302021-02-26T04:49:10+5:30
तुमसर समिती अंतर्गत ९७ ग्रामपंचायतींचे कार्यक्षेत्र येत असून, सदर ग्रामपंचायतींच्या हद्दीतील गरजू लाभार्थ्यांना शासनाकडून प्रधानमंत्री आवास घरकूल योजना मंजूर ...
तुमसर समिती अंतर्गत ९७ ग्रामपंचायतींचे कार्यक्षेत्र येत असून, सदर ग्रामपंचायतींच्या हद्दीतील गरजू लाभार्थ्यांना शासनाकडून प्रधानमंत्री आवास घरकूल योजना मंजूर झाली आहे. त्या लाभार्थ्यांच्या खात्यात घरकूल योजनेचा पहिला, दुसरा व तिसरा अशा तीन टप्प्यांत रक्कम जमा केली जाते. परंतु, येथील प्रधानमंत्री आवास योजना विभागातील कंत्राटी अभियंता प्रणय बारस्कर तालुक्यातील गरजू लाभार्थ्यांकडून खात्यात पैसे जमा करून देण्याच्या नावाखाली अवैध पैशांची वसुली करीत असल्याची व मानसिक, आर्थिक त्रास देत असल्याची तक्रार तुमसर खंडविकास अधिकारी धीरज पाटील यांना संबंधित घरकूल लाभार्थ्यांनी केली. त्या प्रकरणाची दखल घेत तुमसर तालुका काँग्रेस कमेटी व छावा संग्राम परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटी अभियंता बारस्कर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत नाही तोपर्यंत येथील खंडविकास अधिकारी धीरज पाटील यांना त्यांच्या कक्षाबाहेर जाऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेत त्यांच्या कक्षातच तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन करून घेराव घातला. सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत खंडविकास अधिकारी यांनी घरकूल लाभार्थ्यांकडून अवैध वसुली करणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेचे अभियंता बारस्कर यांना आपल्या कक्षात बोलावून संबंधित लाभार्थी व आंदोलकांसमक्ष संबंधित अभियंता बारस्कर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन आंदोलकांना देण्यात आले. त्या धर्तीवर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. दरम्यान, आंदोलकांनी संबंधित घरकूल आवास योजनेचे अभियंता बारस्कर यांच्यावर आठ दिवसांत कारवाई करण्यात आली नाही, तर यापुढे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा दिला.
या वेळी तुमसर तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष शंकर राऊत, रमेश पारधी, कलाम शेख, हिरालाल नागपुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बालकदास ठवकर, सरपंच आनंद सिंगनजुडे, गळिराम बांडेबुचे, रामदास बडवाईक, देवा भगत, शुभम गभने, प्रफुल वराडे, भोला राखडे आदी उपस्थित होते.