ढोलताशांच्या गजरातून गणरायाला वंदन
By admin | Published: September 26, 2015 12:28 AM2015-09-26T00:28:42+5:302015-09-26T00:28:42+5:30
हल्ली रोजगारासाठी कामांचा शोध घ्यावा लागतो. रोजगारांचे साधन मिळविल्यानंतर अंगात कलागुण असले की गुणातून ती कला जनतेसमोर प्रकट करतात.
नागरिकांनी दिली दाद : नागपूरच्या हौसे कलावंतांचा भृशुंड गणपतीला मानाचा मुजरा, वाद्याने आसमंत दुमदुमला
भंडारा : हल्ली रोजगारासाठी कामांचा शोध घ्यावा लागतो. रोजगारांचे साधन मिळविल्यानंतर अंगात कलागुण असले की गुणातून ती कला जनतेसमोर प्रकट करतात. असेच नागपुरातील काही तरुण मंडळी एकत्र आले आणि आपल्या कलागुणांना छंदाच्या माध्यमातून जनतेसमोर आणले. त्या मंडळातील प्रत्येक तरुण शासकीय, निमशासकीय नोकरी सांभाळून केवळ हौसेखातर ‘स्वराज्य गर्जना ढोल-ताशा’ पथक स्थापन केला. आज शुक्रवारला या पथकाने भंडाऱ्याचे आराध्य दैवत भृशुंड गणपती मंदिरात ‘गणराया’ला ढोल ताशा वाजवून वंदन करताना हजारो लोकांची दाद मिळविली.
ढोलताशा म्हणजे महाराष्ट्राच्या मायमराठीचा संगीतमय वारसा. तरुण पिढीचा स्मृतीमय पण पारंपरिक जल्लोष, गणेशोत्सवाचे बिभत्स स्वरुप पाहता गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीत शिस्तबध्दता, पारंपरिकता, रचनात्मकता आणि सौंदर्य असावे या हेतूने नागपूरचे हे समविचारी तरुण एकत्र आले आणि या ध्येयवेड्या तरुणांनी २०१२ मध्ये त्यांनी ‘स्वराज्य गर्जना ढोल-ताशा’ पथकाची निर्मिती केली.
विदर्भातील हे पहिले पथक असून यात शासकीय तथा निमशासकीय विभागात लहान मोठ्या पदावर असलेल्या तरुण व तरुणींचा समावेश असून ते केवळ हौसेखातर या पथकात दाखल झाले आहेत.
या पथकाकडे ३५ ढोल, १० ताशे एक टोलगाडी, एक शंख, दोन झांझ आदी साहित्य आहे. महिलांना संधी मिळावी या हेतूने पथकात १५ मुलींचा सहभाग आहे. या मुलीही तरुणांच्या ताकदीने ढोल पिटताना पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केले. यातून महिला कुठेही मागे नसल्याचे या तरुणींनी दाखवून दिले.
पथकाचा मानबिंदू म्हणजे ध्वज उंच फडकविला जात होता. सामाजिक बांधीलकी जोपासणारे हे पथक आपले समाजाला काही देणे लागते या उदात्त हेतूने कार्य करीत आहेत. या पथकाला मिळणाऱ्या मानधनापैकी काही मानधन सामाजिक कार्यात खर्च केला जातो. यामध्ये वृध्दाश्रमाला देणगी, २६ जानेवारीला अभिमान तिरंगाचा उपक्रम, रामनवमी शोभायात्रेत प्रसाद वितरण, गुढीपाडवा पहाट आदी उपक्रम या माध्यमातून राबविले जात असल्याचे ‘स्वराज्य गर्जना ढोल-ताशा’ पथकाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (शहर प्रतिनिधी)