वन्य प्राण्यांच्या भीतीमुळे मचाणावरून निगराणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:34 AM2021-03-21T04:34:28+5:302021-03-21T04:34:28+5:30
शेतकऱ्यांत वन्य प्राण्यांच्या हल्ल्याची भीती : शासकीय आर्थिक मदत आखडती चुल्हाड ( सिहोरा) : वन्यप्राण्यांचे वाढते हल्ले लक्षात घेता, ...
शेतकऱ्यांत वन्य प्राण्यांच्या हल्ल्याची भीती : शासकीय आर्थिक मदत आखडती
चुल्हाड ( सिहोरा) : वन्यप्राण्यांचे वाढते हल्ले लक्षात घेता, शेतकऱ्यांनी शेतशिवारात असणाऱ्या उत्पादनावर निगराणी ठेवण्यासाठी मचाणाचा आधार घेतला आहे. यावरून वन्य प्राण्यांची दहशत शेतकऱ्यांत दिसून येत आहे. सिहोरा परिसरात शेतकरी स्वयंघोषित उपाययोजना करीत आहेत. दरम्यान, वन्यप्राण्यांचे हल्ल्यातील आर्थिक मदत आखडती असल्याने शेतकऱ्यांत भीती आहे. आर्थिक मदत वाटपात वाढ करण्याची मागणी ग्रामीण भागातील शेतकरी करीत आहेत. याशिवाय शेत शिवाराला सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.
जिल्ह्यात नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिहोरा परिसरात सातपुडा पर्वत रांगा आणि घनदाट जंगल आहे. नद्याचे खोरे असल्याने बारमाही वाहणारे पाणी आहे. घनदाट जंगलात वन्यप्राण्यांचा मुक्त संचार आहे. गावांचे शेजारी जंगल असल्याने शेत शिवारात वन्य प्राण्यांची धुडगूस सुरू झाली आहे. शेतात असणाऱ्या उत्पादित कडधान्यावर वन्य प्राणी ताव मारत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. शेतीचे सुरक्षा करण्यासाठी तारेचे कुंपण करण्याचे प्रयत्न शेतकऱ्यांनी केले आहेत, परंतु या कुंपणाचा फायदा होतांना दिसत नाही. कुंपण तोडून शेतात वन्य प्राणी शिरकाव करीत आहेत. शेतात प्रचंड नासाडी करीत असल्याने आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. वन विभागाच्या यंत्रणेला माहीत देण्यात येत असली, तरी काही बाबतीत तरतुदी नसल्याने मदतीपासून शेतकरी वंचित राहत आहेत. मुरली, सोनेगाव, धनेगाव, बोरगाव, टेमनी, चांदपूर, गोंदेखारी, सुकली नकुल, गोंडीटोला, बिनाखी, देवरी देव, गावांचे शिवारात असणारे शेतकरी वन्य प्राण्यांच्या उपद्रवाने त्रस्त झाले आहे. या शिवाय वन्यप्राणी शेतशिवारात नासाडी केल्यानंतर शेतकऱ्यांवर हल्ले करीत असल्याने मोठ्या दहशतीत शेतकरी आहेत.
वन्यप्राण्यांचे हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनीच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. शेतात पिकांचे सुरक्षा करण्यासाठी मचाण निर्मिती केली आहे. या मचाणावर बसून शेत शिवारात निगराणी ठेवण्यात येत आहे. वन्य प्राण्यांना शेतातून हाकलून लावण्यासाठी डबे उपयोगात आणले जात आहेत. रात्री डब्यांच्या आवाजाने वन्य प्राणी पळून जात असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. मचाणावरून निगराणी ठेवताना वन्य प्राण्यांचे भीती राहत नाही. यामुळे शेतकऱ्यांना कल मचाण निर्मितीकडे असल्याचे दिसून येत आहे. शासन स्तरावरून शेतकऱ्यांचे शेतीला सुरक्षित करण्यासाठी योजना राबविण्यात येत नाहीत. योजना असल्या, तरी त्या युद्धस्तरावर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यापासून सुरक्षित उपाययोजना करण्यासाठी वन विभागाकडून मचाण निर्मितीची प्रेरणा घेतली आहे. वन विभागाने वन्य प्राण्यांच्या गणनेकरिता असे जंगलात मचाण निर्मिती केल्या आहेत. शेतकऱ्यांना शेत शिवारात तारेचे कुंपण योजना राबविण्यात येत असली, तरी बोटावर मोजण्या इतपत लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. दरम्यान, रात्री शेत शिवारात कडधान्याची सुरक्षा करताना, मचाण फायदेशीर ठरत आहेत. वन्यप्राण्यांपासून हल्ल्याची भीती राहत नाही. यामुळे हा पॅटर्न राबविण्याची ओरड सुरू झाली आहे.
बॉक्स
शेतकऱ्यांना सरसकट मचाण मंजूर करा
शेत शिवारात कडधान्याची सुरक्षा व देखरेख करण्यासाठी शेतकरी बहुतांश शेत शिवारात वास्तव्य करतात, दिवस-रात्र शेतात राहत असल्याने, वन्य प्राण्यांच्या हल्ल्याची भीती राहत आहे. शासनाने शेतकऱ्यांना सरसकट लोखंडी मचाण मंजूर करावे, अशी मागणी गोंडीटोला ग्रामपंचायतीच्या सदस्य शीतल चिंचखेडे यांनी केली आहे.
लोखंडी मचाणाच्या निर्मितीतून शेतकऱ्यांच्या जीवाचे सरंक्षण होणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाने मचाणाकरिता अनुदान दिले पाहिजे.
सतीश सोनेवाणे, सामाजिक कार्यकर्ते, पांजरा