भंडारामध्ये १०८५ एकरातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण; शेतकरी राहणार खरीप हंगामापासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 11:37 AM2024-08-08T11:37:01+5:302024-08-08T11:45:04+5:30

अतिवृष्टीमुळे नुकसान वाढीची शक्यता : पंचनामे पूर्ण होण्यास लागणार वेळ

Survey of damage in 1085 acres completed in Bhandara; Farmers will be deprived of Kharif season | भंडारामध्ये १०८५ एकरातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण; शेतकरी राहणार खरीप हंगामापासून वंचित

Survey of damage in 1085 acres completed in Bhandara; Farmers will be deprived of Kharif season

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली :
तालुक्यात मागील दहा-बारा दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन साकोली तालुक्यातील धानपीक, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले. यानंतर कृषी विभागाने पंचनामे करण्यास सुरुवात केली असून, शनिवारपर्यंत ४३४ हेक्टरमधील पिकांचे पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती प्रभारी तालुका कृषी अधिकारी झंजाळ यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.


जुलै महिन्यात सलग बारा दिवस पाऊस झाला. तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण होऊन हजारो हेक्टर शेती पाण्याखाली होती. पुरामुळे अनेक शेतकऱ्यांची केलेली रोवणी वाहून गेली. तर काही शेतकऱ्यांचे पन्हे आणि धान सडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी अनेक शेतकऱ्यांना खरीप हंगामापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने कृषी आणि महसूल विभागाच्या यंत्रणेला दिले होते. 


कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात ४३४ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाल्याचे पुढे आले होते. दरम्यान, कृषी विभागाने नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे करण्यास सुरुवात केली असून, आतापर्यंत ४३४ हेक्टरमधील नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण झाले. गेल्या तीन दिवसांपासून पाऊस हजेरी लावत असल्याने नुकसानीचे पंचनामे करताना कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना अडचण जात आहे.


नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता
तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. त्यातच मोठ्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पिकांच्या नुकसानीच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.


शेतकरी म्हणतात, पुरेसा झाला पाऊस
तालुक्यात दोन दिवस वगळता सलग पंधरा दिवसांपासून पाऊस सुरू आहे. अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने धान पिकांवर कीड रोगाची शक्यता बळावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली असून, आता पाऊस पुरेसा झाल्याचे सांगत आहेत.
 

Web Title: Survey of damage in 1085 acres completed in Bhandara; Farmers will be deprived of Kharif season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.