मंडळ अधिकाऱ्यांना निलंबित करा
By Admin | Published: June 20, 2016 12:25 AM2016-06-20T00:25:26+5:302016-06-20T00:25:26+5:30
लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील मंडळ अधिकारी टी.आर. गिऱ्हेपुंजे यांना निलंबित करावे, ...
नितीन रणदिवे यांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
भंडारा : लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील मंडळ अधिकारी टी.आर. गिऱ्हेपुंजे यांना निलंबित करावे, अशी मागणी छावा संग्राम परिषदेचे पालांदूर जिल्हा परिषद सर्कलचे अध्यक्ष नितीन रणदिवे तथा नागरिकांनी केली आहे. मागण्यांची पुर्तता न झाल्यास २१ जून रोजी नायब तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे पालांदूर येथील मंडळ अधिकारी टी.आर. गिऱ्हेपुंजे हे आपल्या पदाचा दुरूपयोग करीत आहेत. जमिनीचे फेरफार, अतिक्रमण निर्मूलन, नमुना ८, सातबारा इतर महसुल कामासाठी नागरिकांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करतात.
याला कंटाळून ५ जून रोजी येथील काही नागरिक व ट्रॅक्टर मालकांनी नितीन रणदिवे यांच्याकडे मदतीच्या आशेपोटी गिऱ्हेपुंजे यांची तक्रार केली होती. रणदिवे यांनी याची शहानिशा करण्यासाठी ९ जून रोजी मऱ्हेगाव रेती घाटावर गेले. त्या ठिकाणी मंडळ अधिकारी व इतर महसुल कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत गिऱ्हेपुंजे यांना विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. विशेष म्हणजे रणदिवे हे कुठल्याही रेतीघाटातत भागीदार नसतानाही, त्यांच्या मालकीचे ट्रॅक्टर नसताना त्यांच्यावर रेतेतस्कर असल्याचा ठपका ठेवण्यात आला.
नागरिकांना त्रास देऊन माझी प्रतीमा मलीन करण्याचा हा अधिकाऱ्याचा व राजकीय लोकांचा डाव असून तो मी खपवून घेणार नाही, असा खणखणीत इशाराही नितीन रणदिवे यांनी दिला आहे. सदर मंडळ अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात यावे, अन्यथा २१ जून रोजी पालांदूर बसस्थानक ते नायब तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)