१४ दिवसांत दोन वनकर्मचारी निलंबित
By admin | Published: August 22, 2016 12:35 AM2016-08-22T00:35:16+5:302016-08-22T00:35:16+5:30
भंडारा उपवनसंरक्षक कार्यालयांतर्गत कार्यरत दोन वनकर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात : वनरक्षक, वरिष्ठ लिपिकाचा समावेश, उपवनसंरक्षकांचा ‘इगो हर्ट ’झाल्याचा आरोप
भंडारा : भंडारा उपवनसंरक्षक कार्यालयांतर्गत कार्यरत दोन वनकर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ही कारवाई १४ दिवसांत करण्यात आल्याने वनकर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांनी ही कारवाई केली असून या कारवाईविरुद्ध वनकर्मचाऱ्यांची संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.
भंडारा उपवनसंरक्षक कार्यालयात उपवनसंरक्षक म्हणून उमेश वर्मा हे काही दिवसापूर्वी भंडारा येथे रूजू झाले. त्यांनी आल्याआल्यात दोन वनकर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. केवळ ‘इगो हर्ट’ झाल्यामुळे ही कारवाई केल्याचा आरोप आता वनकर्मचारी संघटनेने केला आहे. या कारवाईत वनरक्षक बी.एस. कुंभारे व एच.वाय. धार्मिक यांचा समावेश आहे.
वनरक्षक बी.एस. कुंभारे हे उपवनसंरक्षक कार्यालयातील कॅम्प हाऊस येथे कर्तव्यावर होते. दरम्यान त्यांच्याकडे माडगी - २ क्षेत्राचा अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला. यासाठी त्यांना वर्मा यांनी आदेश बजावले. मात्र वर्षभरापूर्वीच एकुलत्या एका मुलाचा मृत्यू झाल्याने त्याने त्यांनी भंडारा येथे बदली करून घेतली होती. त्यातच पत्नीही आजारी राहत असल्याने व त्यांनाही मधुमेहाचा त्रास असल्याने माडगी येथे रूजू होण्याच्या आदेशाबाबत एक दिवसाचा अवधी द्यावा अशी विणवणी कुंभारे यांनी केली होती. मात्र उपवनसंरक्षक वर्मा यांनी त्यांच्या आदेशाची अवहेलना केल्याचा राग धरून ५ आॅगस्ट ला कुंभारे यांना निलंबनाचे आदेश बजावले. विशेष म्हणजे वर्मा यांनी १ आॅगस्टला माडगी क्षेत्राचा अतिरिक्त प्रभार घेण्याचा आदेश बजावला होता. परंतु प्रकृती अस्वस्थतेमुळे कुंभारे हे वैद्यकीय रजेवर असताना त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
भंडारा वनविभागाची आढावा बैठक १८ आॅगस्टला घेण्यात आली. या बैठकीला वनविभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान कामाच्या नियोजनाच्या अंदाजपत्रकावरून धार्मिक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. एका वनपरिक्षेत्रात करण्यात येणाऱ्या कामाचे अंदाजपत्रक मंजुरीसाठी नियोजन विभागाकडे पाठविण्यात आले होते. सदर वनक्षेत्राधिकाऱ्याने सदर अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाली असून वनविभागाकडे प्रकरण रखडले असून वरिष्ठ लिपिक धार्मिक याला जबाबदार असल्याचा आरोप लावण्यात आला होता. तर धार्मिक यांनी सदर अंदाजपत्रक प्राप्त झाले नसल्याची माहिती अधिकाऱ्यांना बैठकीत दिली. या प्रकरणात कुठल्याही प्रकारची शहानिशा किंवा त्यांना संधी न देता उपवनसंरक्षकांनी त्यांच्यावरही तातडीने निलंबनाची कारवाई केली.
या कारवाईविरुद्ध महाराष्ट्र वनरक्षक, वनपाल संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात असून उद्या सोमवारला या महत्वाच्या विषयावर संघटनेची बैठक बोलाविली आहे. यात निर्णय घेऊन आंदोलनाची दिशा ठरविणार असल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)
दोघांनाही संधी देणे गरजेचे
वनरक्षक डी.एस. कुंभारे व वरिष्ठ लिपिक एच.वाय. धार्मिक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तत्पूर्वी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोघांनाही त्यांची बाजू ऐकून घेणे किंवा तशी संधी देणे क्रमप्राप्त होते. मात्र कुंभारे व धार्मिक यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी न देता कारवाई करण्यात आली. ही कारवाई सुडबुद्धीने व अन्यायपूर्वक असल्याची चर्चा वनकर्मचाऱ्यांमध्ये सुरु आहे.
महाराष्ट्र नागरी कायदा १९७९ च्या नियम ८ अन्वये शिस्तभंग केल्याची कारवाई करण्यात आली. ही कारवाई नियमानुसार करण्यात आली असून ती योग्य आहे.
- उमेश वर्मा
उपवनसंरक्षक, भंडारा.
वनकर्मचाऱ्यांना संधी देण्यात आली नाही. दोघांवरही करण्यात आलेली कारवाई अन्यायपूर्वक आहे. त्यांचे निलंबन मागे न घेतल्यास संघटना आंदोलनाची दिशा ठरवेल.
- टी.एच. घुले
जिल्हाध्यक्ष, वनकर्मचारी संघटना