वीज वितरणच्या निलंबित कर्मचाऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 01:19 AM2019-06-12T01:19:38+5:302019-06-12T01:20:53+5:30
वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर वीज वितरण कंपनीत लागलेल्या आणि अलिकडेच निलंबित झालेल्या एका तरूण लाईनमनने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना पवनी तालुक्यातील कोसरा (कोंढा) येथे सोमवारी सायंकाळी उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढा (कोसरा) : वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर वीज वितरण कंपनीत लागलेल्या आणि अलिकडेच निलंबित झालेल्या एका तरूण लाईनमनने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना पवनी तालुक्यातील कोसरा (कोंढा) येथे सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. त्याने घरातील पंख्याला नॉयलॉनच्या दोराने बांधून गळफास लावून घेतला.
संजय रामदास काळे (२६) असे मृत लाईनमनचे नाव आहे. त्याचे वडील रामदास काळे वीज वितरण कंपनीत लाईनमन म्हणून कार्यरत होते. आठ वर्षापुर्वी त्यांच्या वडिलांचे आजारपणाने निधन झाले. त्यामुळे संजयला अनुकंपा तत्वावर नोकरी मिळाली होती. तो कोसरा येथील वीज वितरण कार्यालयात कार्यरत होता. त्यानंतर त्याचे स्थानांतरण पवनी येथे करण्यात आले. तेथे असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत वाद व इतर कारणावरून त्याला निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे तो खचला होता. त्यातच आर्थिक चणचण जाणवत होती. अनेकांकडून त्याने उसणवार पैसे घेतले होते. पैसे परत करण्याच्या विवंचनेने कायम तणावात राहत होता. अशातच त्याला व्यसनही लागले. दोन दिवसापुर्वी आई व लहान बहीण बाहेरगावी गेली. त्यामुळे तो एकटाच घरी होता. सोमवारी सायंकाळी संजय अद्याप का उठला नाही म्हणून परिसरातील नागरिकांनी खिडकीतून डोकावून पाहिले तेव्हा तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती अड्याळ पोलिसांना देण्यात आली. मंगळवारी दुपारी १ वाजता त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्युपूर्वी त्याने चिठ्ठ्या लिहिल्या असून त्या अड्याळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नेमके या चिठ्ठीत काय लिहिलेले आहे हे मात्र कळू शकले नाही. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरेश ढोबळे करीत आहे. वडिलांच्या निधनानंतर आईचा एकमेव आधार असलेल्या संजयने आत्महत्या केल्याने आईवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.