उमेदवारांच्या नावांचा ‘सस्पेंस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 06:00 AM2019-10-03T06:00:00+5:302019-10-03T06:00:44+5:30

भंडारा विधानसभेची कुणाला तिकीट मिळणार यावरून विविध चर्चा सुरु आहेत. भाजप-शिवसेना युतीतील आठवले गटाला ही जागा देणार असल्याची चर्चा बुधवारी रंगत होती. भाजपकडून निवडणुकीच्या तयारीत असलेल्यांच्या हृदयाचे ठोके वाढत गेले. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत मित्रपक्ष पीरिपाच्या कवाडे गटाला ही जागा जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

Suspense of candidates' names | उमेदवारांच्या नावांचा ‘सस्पेंस’

उमेदवारांच्या नावांचा ‘सस्पेंस’

Next
ठळक मुद्देचर्चांना उधाण : भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या यादीकडे जिल्हावासीयांचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याला अवघे दोन दिवस उरले असताना जिल्ह्यातील तीनही मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांचा सस्पेंस कायम आहे. भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाने बुधवारी रात्रीपर्यंत उमेदवारांच्या नावांची घोषणा केली नव्हती. त्यामुळे उमेदवारीवरून विविध चर्चांना उधाण आले होते. सोशल मीडियावर विविध नावांची चर्चा रंगत आहे. सर्वांच्या नजरा अधिकृत घोषणेकडे लागल्या आहेत.
भंडारा जिल्ह्यात तुमसर, भंडारा आणि साकोली हे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. सध्या तीनही ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. भंडारा विधानसभा क्षेत्र अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. नामांकन दाखल करण्यास अवघे दोन दिवस उरले असतानाही अद्यापर्यंत कोणत्याही पक्षाने उमेदवारी जाहीर केली नाही. मंगळवारी भाजप आणि काँग्रेसने आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. परंतु त्यात भंडारा जिल्ह्यातील एकाही मतदारसंघाचा समावेश नव्हता. त्यामुळे राजकीय नेत्यांसह सर्वसामान्यांची उत्सूकता वाढली आहे.
भंडारा विधानसभेची कुणाला तिकीट मिळणार यावरून विविध चर्चा सुरु आहेत. भाजप-शिवसेना युतीतील आठवले गटाला ही जागा देणार असल्याची चर्चा बुधवारी रंगत होती. भाजपकडून निवडणुकीच्या तयारीत असलेल्यांच्या हृदयाचे ठोके वाढत गेले. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत मित्रपक्ष पीरिपाच्या कवाडे गटाला ही जागा जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे काँग्रेस इच्छुकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. भंडारातून शिवसेनाही निवडणूक लढण्याच्या तयारीत होती. आता माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी अपक्ष निवडणूक लढण्याची जोरदार तयारी केली आहे.
तुमसर विधानसभा मतदारसंघातही अद्याप उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली नाही. युती आणि आघाडी उमेदवारीसाठी घमासान दिसत आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या या मतदारसंघात कुणाला उमेदवारी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान आमदार चरण वाघमारे यांनी मंगळवारी अपक्ष आणि भाजपतर्फे नामांकन दाखल केले. परंतु पक्षाने अद्याप कुणाच्याही नावाची घोषणा केली नाही. त्यामुळे ऐनवेळेवर भाजप कुणाला तिकीट देणार याची उत्सूकता सर्वांना लागली आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेचा मतदारसंघ म्हणजे साकोली विधानसभा मतदार संघ होय. या मतदारसंघात काँग्रेसतर्फे नाना पटोले निवडणूक लढणार असे सांगितले जात आहे. त्यामुळे भाजपतर्फेही त्याच तोडीचा उमेदवार देण्याचा प्रयत्न चालू आहे. अद्यापपर्यंत कुणाच्या नावाची घोषणा झाली नसली तरी भाजप येथे तगडा उमेदवार देऊन निवडणुकीत रंगत आणणार आहे.
एकंदरीत विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या नावाचा सस्पेंस अखेरच्या दिवसापर्यंत कायम राहणार अशी शक्यता दिसत आहे. दुसरीकडे बंडखोरी टाळण्यासाठी ऐन वेळेवर उमेदवारांची घोषणा केली जाणार असे सांगितले जात आहे.
नामांकनासाठी आता दोन दिवस
विधानसभेसाठी नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख ४ आॅक्टोबर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत साकोली आणि तुमसर विधानसभा क्षेत्रातून प्रत्येकी दोन असे चार नामांकन दाखल झाले आहेत. शेवटच्या दोन दिवसात नामांकन दाखल करणाऱ्यांची सर्वाधिक संख्या राहणार आहे. उमेदवारांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर पक्षाचे अधिकृत उमेदवारही नामांकन दाखल करतील.

Web Title: Suspense of candidates' names

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.