रेतीघाटांना स्थगिती, मात्र अहोरात्र खनन सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 10:20 PM2019-05-20T22:20:26+5:302019-05-20T22:20:46+5:30
जिल्ह्यातील ४९ पैकी १९ रेतीघाटांचा लिलाव झाला. लिलावाचा निधी शासकीय तिजोरीत जमा झाला. २५ ते ३० दिवस रेतीचा उपसाही सुरू केला. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशावरून जिल्हाधिकाऱ्यांनी घाटातून रेती खनन व वाहतुकीवर बंदी आणली. उत्खननास बंदी असली तरी रेतीचे खनन मात्र सर्रास सुरू आहे.
मुखरू बागडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : जिल्ह्यातील ४९ पैकी १९ रेतीघाटांचा लिलाव झाला. लिलावाचा निधी शासकीय तिजोरीत जमा झाला. २५ ते ३० दिवस रेतीचा उपसाही सुरू केला. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशावरून जिल्हाधिकाऱ्यांनी घाटातून रेती खनन व वाहतुकीवर बंदी आणली. उत्खननास बंदी असली तरी रेतीचे खनन मात्र सर्रास सुरू आहे.
भंडारा जिल्ह्यात वैनगंगा, चुलबंद, बावनथडी आदी नद्यांवर रेतीघाट आहे. भंडारा जिल्ह्यातील रेतीला विदर्भात मागणी आहे. त्यामुळेच या रेतीवर कंत्राटदारांच्या उड्या पडतात. प्रशासनाने रेतीघाटाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली होती. ४९ पैकी १९ रेतीघाटांचे लिलाव झाले होते. त्यात लाखनी तालुक्यातील पालांदूर शेजारी वाकल व पाथरी घाट सुमारे तीन कोटी रूपयात गेला होता. उर्वरित घाटांचा लिलाव काही कारणाने झाला नाही. पळसगाव घाट राखीव ठेवण्यात आला. विक्री झालेल्या घाटातून नियमानुसार निश्चित दराने रेतीची उचल सुरू झाली. परंतु न्यायालयीन अडथळ्याने रेती उत्खनन व वाहतुकीला स्थगिती मिळाली. त्यामुळे प्रशासनाने ताबा घेत घाटावर बंदी आणली.
मात्र जिल्ह्यातील बहुतांश घाटांवरून रेतीची वाहतूक खुलेआम सुरू आहे. तुमसर, पवनी तालुक्यातील घाटांवरून शेकडो वाहने रेतीची चोरी करीत आहे. हा प्रकार जिल्हा खनिकर्म विभागासह महसूल अधिकाऱ्यांना माहित आहे. यातून शासनाच्या महसुलाला चुना लागत आहे. परंतु याकडे कुणाचेही लक्ष दिसत नाही.
भंडारा जिल्ह्यात रेतीतस्कर सध्या धुमाकूळ घालत असून यात अनेकांचा बळी गेला आहे. मोहाडी तालुक्यातील रोहा रेतीघाटावर एक विद्यार्थी जेसीबीच्या पंजाने जखमी होऊन मृत्युमुखी पडला. तर महसूलच्या पथकाला न जुमानता वाहने पळवून नेण्याच्या घटनातही वाढ झाल्याचे जिल्ह्यात दिसून येत आहे.
लिलावासाठी कंत्राटदारांची चेन
जिल्ह्यातील रेतीघाटांची किंमत कोट्यवधीच्या घरात असते. त्यामुळे एकापेक्षा अधिक कंत्राटदार एकत्र येऊन चेन तयार करतात. आॅनलाईन पद्धतीने सोपस्कार आटपून प्रक्रिया केली जाते. ज्या कंत्राटदारांना घाट मिळाले नाही ते न्यायालयात पोहोचतात. तेथून स्थगिती मिळते मात्र या काळात रेतीची तस्करी जोमात होते.
खनन बंदी मात्र बांधकाम सुरू
भंडारा जिल्ह्याचे रेतीघाटावर खननाला बंदी असली तरी सर्वत्र सिमेंट काँक्रीटचे बांधकाम सुरू आहे. यात शासकीय कामांचाही समावेश आहे. एकीकडे रेतीघाटावर बंदी असताना दुसरीकडे रेती उपलब्ध कशी होते, हा संशोधनाचा विषय आहे.