पत्नीचा घरात संशयास्पद मृत्यू, पतीने घेतले विष; कारण अस्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2022 06:44 PM2022-03-21T18:44:13+5:302022-03-21T18:45:27+5:30
पत्नीच्या मृत्यूचे नेमके कारण पुढे आले नाही. त्यामुळे पाेलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नाेंद केली आहे.
साकोली (भंडारा) : पत्नीचा घरात संशयास्पद मृतदेह आढळून आल्यानंतर पतीनेही विष घेतल्याची घटना साकाेली तालुक्यातील पळसपाणी येथे रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. पतीची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पत्नीच्या मृत्यूचे नेमके कारण पुढे आले नाही. त्यामुळे पाेलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नाेंद केली आहे.
पपिता चरणदास राऊत (३२) असे मृत पत्नीचे नाव आहे, तर चरणदास राऊत (४२) असे पतीचे नाव आहे. साकाेली तालुक्यातील पळसपाणी येथे रविवारी दुपारी त्यांनी जेवण घेतले. चरणदासची आई मधल्या खाेलीत गेली असता तिला पपिता चटईवर झाेपलेल्या अवस्थेत दिसली. मात्र आवाज देऊनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तिने आरडाओरड केला. ताेपर्यंत चरणदास मात्र घरून निघून गेला हाेता. पाेलीस पाटलाच्या सहाय्याने पाेलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पपिताला साकाेली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रात्री ९ वाजताच्या सुमारास दाखल केले. मात्र डाॅक्टरांनी तपासताच मृत घाेषित केले.
इकडे घरच्या मंडळींनी चरणदासचा शाेध सुरू केला. ताे काेहळीकिन्नी येथे बहिणीकडे पळून गेला हाेता. त्यावेळी त्याने कीटकनाशक प्राशन केल्याचे लक्षात आले. उशिरा रात्री त्याला साकाेलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने, त्याला भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात साेमवारी सकाळी दाखल केले.
तूर्तास पाेलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नाेंद घेतली असून, शवविच्छेदन अहवालानुसार नेमके मृत्यूचे कारण कळेल, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे ठाणेदार जितेंद्र बाेरकर यांनी सांगितले.
पपिता चरणदासची तिसरी पत्नी
पपिता आणि चरणदास यांचा पाच वर्षापूर्वी विवाह झाला हाेता. पपिता ही चरणदासची तिसरी पत्नी हाेय. त्यांना तीन वर्षाची मुलगी आहे. मात्र आता पपिताचा नेमका मृत्यू कशाने झाला, हे कळायला मार्ग नाही. पाेलीस तपास करीत आहेत.