समतोल शाश्वत विकासाचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 10:59 PM2018-01-02T22:59:48+5:302018-01-02T23:01:01+5:30

भंडारा जिल्ह्यात मनरेगा, गोसीखुर्द, जलयुक्त शिवार, कृषी पंपांना जोडणी कृषी यांत्रिकीकरण, महिला सक्षमीकरण, गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवार, आरोग्य सेवा आदी बाबत लक्षणीय काम झाले आहे.

Sustainable sustainable development planning | समतोल शाश्वत विकासाचे नियोजन

समतोल शाश्वत विकासाचे नियोजन

Next
ठळक मुद्देसुहास दिवसे : भंडारा मनरेगा पॅटर्न राज्यात लागू, गोसेखुर्दमधून ६२ हजार हेक्टर सिंचन, ८ हजार ९००

कृषी पंपांना वीज जोडणी
आॅनलाईन लोकमत
भंडारा : भंडारा जिल्ह्यात मनरेगा, गोसीखुर्द, जलयुक्त शिवार, कृषी पंपांना जोडणी कृषी यांत्रिकीकरण, महिला सक्षमीकरण, गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवार, आरोग्य सेवा आदी बाबत लक्षणीय काम झाले आहे. जिल्ह्याची वाटचाल विकासाच्या दृष्टीने अधिक जोमाने होत आहे. विविध नाविण्यपूर्ण उपक्रम व व्हीजन २०२२ तयार करण्यात आले आहे. समतोल शाश्वत विकासाच्या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. विशेष म्हणजे जलयुक्त शिवारमध्ये ९५ ठिकाणी जल पुनर्भरणाची कामे घेणारा भंडारा हा एकमेव जिल्हा असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षभरात ‘सिद्धी २०१७, संकल्प २०१८’ या मोहिमेंतर्गत राबविलेल्या उत्कृष्ट कामाची तसेच जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे यावेळी उपस्थित होते.
संकल्प ते सिद्धी या मोहिमेत गेल्या वर्षभरात प्रशासनाने जिल्ह्यात जी विकासाची कामे केली ती गौरवास्पद आहेत. मनरेगात १०० टक्के मजुरीचे विहित वेळेत वाटप करण्यात आले. तसेच २० हजार २६२ कामांचे जिओ टॅगिंग करण्यात आले. मनरेगात जिल्ह्याने उत्कृष्ट कार्य केले. जिल्हा राज्यात अव्वलस्थानी आहे. भंडारा पॅटर्नचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडून प्रशंसा झाली. मनरेगाचा भंडारा पॅटर्न संपूर्ण राज्यात लागू करण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. भंडारा पॅटर्नची केंद्राने दखल घेतली आहे. ही व्यवस्था पाहण्यासाठी केंद्राची चमू भंडारा येथे येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
गोसीखुर्द मधून २०१७ अखेर ६२ हजार २६३ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली असून डिसेंबर २०१९ अखेर १ लाख ८८ हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्मितीचे नियोजन आहे. केंद्रीय जल आयोगाने गोसीखुर्दच्या कामासाठी नाबार्ड मार्फत ७५० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने होईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. मनरेगा व जलयुक्त यांची सांगड घालून मलबेरी लागवडीस जिल्ह्यात प्राधान्य देण्यात येणार आहे. गोसीखुर्द मधील भूसंपादनाची कामे पूर्णत्वास आली आहेत.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तीन वर्षात २०१ गावांची निवड करण्यात आली होती. त्यामधून २७ हजार २०० हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे. सन २०१५-२०१६ मध्ये ८६ पैकी ८६ गावे वॉटर न्युट्रल झाली आहे. जिल्ह्यातील भूगर्भात पाणी साठवून पाण्याची पातळी वाढविण्यासाठी ९५ ठिकाणी जल पुनर्भरण हा अभिनव कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमासाठी शासनातर्फे निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे काम गुणवत्तापूर्ण राहणार आहे. यात वन विभागाचा सहभाग मोठा राहणार आहे. कृषी यांत्रिकीकरणात जिल्हा राज्यात अव्वल असल्याचे त्यांनी सांगितले. तीन वर्षात जिल्ह्यात ८ हजार ९०० कृषी पंपांना वीज जोडणी देण्यात आली आहे. तसेच १८७ लाभार्थ्यांना सौर कृषी पंपांचा लाभ देण्यात आला आहे. पॉस मशिनचा प्रयोग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होत असून त्यामुळे स्वस्त धान्य वितरणात पारदर्शकता आली आहे. गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवार अंतर्गत ५२ तलावातील ४५ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला. हा काढलेला गाळ ६७० हेक्टर शिवारात टाकण्यात आला. यात ८०० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. मनोधैर्य योजनेत ४८ पीडित मुलींना शासनाने बळ दिले असून ८१ लाख रुपये मदतीसोबतच वैद्यकीय आणि कायदेशिर सल्ला देण्यात आला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांनी स्वच्छता दर्पण या केंद्र शासन पुरस्कृत योजनेत देशातील ४५ जिल्ह्याचा समावेश असल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेतील कार्यालयाची स्वच्छता करण्यात आली तसेच कर्मचाºयांचे सेवाविषयक प्रलंबित प्रश्न सोडविले. आरोग्य विभागातही जिल्हा राज्यात प्रथम आहे. आपले सरकार सेवा केंद्र बाबत बोलताना ते म्हणाले, ११ अ‍ॅपवर माहिती अपलोड करण्याच्या कामात भंडारा जिल्हा प्रत्येक अ‍ॅपमध्ये पहिला, दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि राज्यात अव्वल क्रमांकावर आहे. भंडारा मध म्हणून प्रसिद्ध व्हावे असा मानस आहे. फिरते पोलीस स्टेशनबाबत बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी जिल्ह्यात ६०० पोलीस स्टेशन असून ३४ हजार लोकांचा प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातही हा उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी जाहीर केल्याचे सांगितले. अल्पवयीन मुलींचे घरून पळून जाण्याचे प्रमाणात जिल्ह्यात जास्त असून त्यासाठी शाळेत त्यांना मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे सांगितले.

Web Title: Sustainable sustainable development planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.