सुसुरडोह पुनर्वसित गावात समस्याच समस्या
By admin | Published: May 29, 2016 12:40 AM2016-05-29T00:40:27+5:302016-05-29T00:40:27+5:30
बावनथडी प्रकल्पांतर्गत प्रभावित झालेल्या सुसुरडोह गावाचे पुनर्वसन गर्रा बघेडा गावालगतच्या झुडपी जंगलात करण्यात आले.
अन्यथा आंदोलन : शुभांगी रहांगडाले यांची मागणी
तुमसर : बावनथडी प्रकल्पांतर्गत प्रभावित झालेल्या सुसुरडोह गावाचे पुनर्वसन गर्रा बघेडा गावालगतच्या झुडपी जंगलात करण्यात आले. परंतु शासनाच्या गाव पुनर्वसन अटीप्रमाणे सदर गावातील समस्या योग्यरित्या मार्गी लावण्यात आल्या नाही. आजही पुनर्वसित आदिवासी बांधव मरणयातना भोगत असल्याचे जाणवते. संविधानाने सर्वसामान्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला तर मग पुनर्वसितांना का नाही, असा सवाल करीत शासनाने तात्काळ त्यांच्या समस्या सोडवाव्यात, अन्यथा आंदोलनाचा इशारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती शुभांगी रहांगडाले यांनी दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
तुमसर मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या राजीव गांधी सागर बावनथडी प्रकल्प (धरणा) च्या गळभरणी वेळी सुसुरडोह गावाला पुनर्वसन तालुक्यातील गर्रा बघेडा गावालगत करण्यात आले. खरे मात्र त्या पुनर्वसित सुसुरडोह गावात पिण्याच्या पाण्याची योग्य सोय नाही. गावातील रस्त्याचे कामे अपूर्ण अवस्थेतच आहेत. गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जादेखील मिळाला नाही. त्यामुळे गाव पातळीवर विकास करणे शक्य नाही. शाळेला आवारभिंत नाही. गावाचे पुनर्वसन हे जंगल परिसरात असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना जंगली व हिंसक प्राण्यापासून धोका आहे. सदर गावातील नागरिकांची शेती व घरे बावनथडी प्रकल्पात गेल्यामुळे तेथील शेतकरी भूमिहीन झाले आहेत. त्यांच्याकडे उपजीविकेचे कोणतेही साधन नाही. परिणामी पुनर्वसित गावातील नागरिकांची आर्थिक स्थिती अत्यंत खालावली आहे. त्यामुळे कुपोषितांची संख्या या पुनर्वसित गावात भीती निर्माण झाली आहे. शासनाने पुनर्वसित लोकांसाठी एक लाख रुपयांचे अतिरिक्त पॅकेज देण्याचे पत्रान्वये कबूल केले होते. परंतु त्यांना अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचे पॅकेज देण्यात आले नाही. पुनर्वसित गावातील नागरिक आदिवासी समाजाचेच आहेत. त्यामुळे की काय त्यावर हेतुपुरस्सर अन्याय केला जात आहे. जेव्हा जेव्हा आदिवासी न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकारी गाठतात तेव्हा तेव्हा तुमचे पुनर्वसन झाले व तुमच्या गावाची फाईल बंद झाल्याचे सांगून त्यांची बोळवण केली जाते. त्यांच्यावरील अन्याय हा खपवून घेतला जाणार नाही. त्यांच्या समस्या तातडीने निकाली लावा अन्यथा आंदोलन पुकारल्या जाईल. अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशारा निवेदनातून सभापती शुभांगी रहांगडाले यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)