उपवनसंरक्षक वर्मा यांची तडकाफडकी बदली
By admin | Published: June 24, 2017 12:22 AM2017-06-24T00:22:46+5:302017-06-24T00:22:46+5:30
भंडारा वन विभागाचे उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांच्या बदलीचे आदेश शुक्रवारला धडकले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा वन विभागाचे उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांच्या बदलीचे आदेश शुक्रवारला धडकले. गोंदियाचे उपवनसंरक्षक युवराज यांच्याकडे भंडारा वन विभागाचा पदभार सोपविण्यात आला आहे.
वर्षभरापूर्वी उमेश वर्मा हे भंडारा उपवनसंरक्षक म्हणून रूजू झाले होते. त्यांच्या कार्यकाळात वन विभागाला गती मिळाली असली तरी वनमजूर ते वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर निलंबनाची एकतर्फी कारवाई केल्याने त्यांच्याविरुद्ध रोष निर्माण झाला होता. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र राज्य वन व सामाजिक वनिकरण रोजंदारी मजूर कामगार संघटनेचे अध्यक्ष युवराज रामटेके, वनकामगार संघटनेचे सिराज पटेल, वनरक्षक, वनपाल संघटना नागपूरचे विजय मेहर, कॉस्ट्राईब संघटनेचे सूर्यकांत हुमने आदींनी शासनाकडे तक्रारी केल्या होत्या.
याशिवाय वर्मा यांना त्यांच्याच कार्यालयातून विरोध होता. अखेरीस महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मधील तरतुदीनुसार त्यांची बदली करण्यात आली. बदलीचे आदेश धडकताच कामगार व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपवनसंरक्षक कार्यालयासमोर फटाके फोडून आनंद साजरा केला.