गोडावून झाले फुल्ल, धानाची उचल नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:31 AM2021-01-21T04:31:55+5:302021-01-21T04:31:55+5:30
मुखरू बागडे पालांदूर : वीस दिवसांपासून धान खरेदी गोडावून विविध समस्यांने बंद होते. धान खरेदी कधी सुरू होणार, ...
मुखरू बागडे
पालांदूर : वीस दिवसांपासून धान खरेदी गोडावून विविध समस्यांने बंद होते. धान खरेदी कधी सुरू होणार, अशी शेतकऱ्यांची रोज विचारणा होत होती. शासनाकडून धान उचल करण्याचे आदेश निर्गमित न झाल्याने गोडावून फुल्ल भरून आहेत. भात गिरणी मालकांच्या समस्या न सुटल्याने धान खरेदी प्रकरण आणखी प्रलंबित राहू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांची धान मोजणीची समस्या शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसल्याने शेतकरी समस्येत भर पडली आहे. ढगाळ वातावरणातही गोडावूनच्या मोकळ्या जागेत खुल्या नभाखाली पालांदूर संस्थेने धान मोजणी शेतकरी हितार्थ सुरू केली आहे.
वीस दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शेतकऱ्यांचे धान मोजणी सुरू झालेली आहे. किमान पंधरा हजार क्विंटल धान गोडावूनच्या भव्य पटांगणात गत ६० ते ७० दिवसांपासून अडून पडले आहे. धानाच्या पोत्याची नुकसान झाले आहे. गोडावून परिसरातील मोकाट जनावरेसुद्धा धानाचे नुकसान करीत आहेत. शेतकरी दररोज आपल्या पोत्याची पाहणी करुन घरी निराशेने परत येतो आहे. सेवा सहकारी संस्थेत शेतकरी भेट देत मोजणी करण्याची विनवणी करत आहेत. संस्थाही शेतकऱ्यांची असल्याने मोजणी करणे अत्यावश्यक आहे. परंतु गोडावून भरले असल्याने व आतापर्यंत एकही क्विंटल धानाची उचल न झाल्याने गोडावून भरलेलीच आहेत. शासन-प्रशासन स्तरावरून भात गिरणी मालकांच्या समस्यांना न्याय न मिळाल्याने त्यांनीसुद्धा माल न उचलण्याचा हट्ट धरल्याने धान खरेदी प्रभावित झालेली आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून धान खरेदी केंद्र पालांदूर येथे सुरू झाले आहे. या खरेदी केंद्रावर सुमारे ३९ हजार क्विंटल धानाची खरेदी दोन गोडावूनच्या माध्यमातून आटोपली आहे. गोडावून रिकामे होतील व आपली खरेदीही सुरळीत राहील, अशी आशा असताना, शासनाकडून सहकार्य न मिळाल्याने धान खरेदी नाईलाजाने सुमारे वीस दिवस बंद ठेवावी लागली.
लोकप्रतिनिधीसुद्धा शेतकरी व भात गिरणी मालकांच्या समस्या सोडविण्यात पुढाकार घेत नसल्याने समस्या प्रलंबित आहे. जिल्हा मार्केटिंग कार्यालय व भात गिरणी मालकांची बैठका सुरू आहेत. परंतु अजून अपेक्षित तोडगा निघालेला नसल्याने आणखी धान खरेदी प्रभावित होण्याची शक्यता वाढलेली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात येऊ नये, याकरिता विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, पालांदूर यांनी मासिक सभा बोलावून शेतकऱ्यांच्या हितार्थ गोडावूनच्या खुल्या जागेत धान खरेदीचा निर्णय घेतला.
चौकट /डब्बा
भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या चारही जिल्ह्यांतील धान खरेदी काही प्रमाणात आटोपलेली असून, अडीच महिन्यात एकही क्विंटल धानाचे कोणत्याही भात गिरणी धारकांनी उचल केलेली नाही. शासन व प्रशासनाच्या डोईजड धोरणाने भात गिरणी मालक सुद्धा संकटात सापडले आहेत. वास्तव परिस्थितीचा विचार न करता, अवास्तव नियमांनी भात गिरणी मालकांचे कंबरडे मोडण्याची शक्यता असल्याने भात गिरणीधारक डिवो स्वीकारायला तयार नाहीत.
शेतकरी हा आमचा आधार असून, संस्थेला धान खरेदी केंद्र मिळालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा धान मोजणे हे आमची जबाबदारी आहे. १९ जानेवारीपर्यंत ३९ हजार पाचशे तीस क्विंटल धानाची मोजणी आटोपलेली आहे. आणखी १५ ते २० हजार क्विंटल धान मोजणी होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने डिवोबाबत त्वरित निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
विजय कापसे,
अध्यक्ष, कार्यकारी सेवा सहकारी संस्था, पालांदूर.