विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या माध्यमातून शिक्षणाची गोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:35 AM2021-05-26T04:35:11+5:302021-05-26T04:35:11+5:30
पालांदूर : कोरोनाच्या वाढत्या महामारीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिकदृष्ट्या खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सोबतच विद्यार्थ्यांचा मनातून शिक्षणाची गोडीदेखील कमी ...
पालांदूर : कोरोनाच्या वाढत्या महामारीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिकदृष्ट्या खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सोबतच विद्यार्थ्यांचा मनातून शिक्षणाची गोडीदेखील कमी होताना दिसत आहे. विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाविषयी आवड तसेच मुलांमध्ये कौशल्य विकास व्हावा याकरिता मॅजिक बस इंडिया फाउंडेशन गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा भंडारा, तालुका लाखनीमधील पालांदूर केंद्रात काम करीत आहे.
विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात यावेत, त्यांच्यात जीवन कौशल्यांचा विकास व्हावा. सोबतच शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी व्हावे, याकरिता मॅजिक बस इंडिया फाउंडेशन सातत्याने काम करीत आहे.
त्यात विद्यार्थ्यांकडून लॉकडाऊनच्या काळात विविध महत्त्वाचे दिवस तसेच शैक्षणिक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे जेणेकरून विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या गुंतून राहतील. यादृष्टीने नुकताच ‘आंतराष्ट्रीय जैवविविधता दिवस’ २२ मेला साजरा करण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी ‘महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळा’द्वारे आयोजित स्पर्धेत आपला सहभाग खूप उत्साहाने नोंदवला. यात विद्यार्थ्यांनी चित्र, पोस्टर, निबंध सादर केले. मॅजिक बस इंडिया फाउंडेशनचे (शाळा साहाय्यक अधिकारी) किरण बागुल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांकडून ‘आंतराष्ट्रीय जैवविविधता दिवस’ साजरा करून घेतला.
या स्पर्धेत पालांदूर केंद्रातून पालांदूर, खराशी, किटाळी, लोहारा, घोडेझरी, महेगाव इत्यादी गावांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.