यंत्रणांनी उद्दिष्टांपेक्षा जास्त वृक्ष लावून संवर्धन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2016 12:38 AM2016-06-28T00:38:36+5:302016-06-28T00:38:36+5:30
जिल्ह्यात २ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यासाठी प्रशासनाने तयारी केली असून यंत्रणांनी उद्दिष्टांपेक्षा जास्त वृक्ष लावून संवर्धन करावे,
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : जिल्ह्यात ८ लाख ५० हजार वृक्ष लागवडीचे नियोजन
भंडारा : जिल्ह्यात २ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यासाठी प्रशासनाने तयारी केली असून यंत्रणांनी उद्दिष्टांपेक्षा जास्त वृक्ष लावून संवर्धन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले आहे. वृक्ष लागवड ही लोक चळवळ व्हावी, लोकांनी स्वयंस्फुर्तपणे वृक्ष लागवड व संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.
कुठल्याही देशाच्या आर्थिक स्थितीचे विश्लेषण करायचे झाल्यास त्या देशातील नागरिकांच्या दरडोई उत्पन्नाचा विचार केला जातो. नागरिकांच्या दरडोई उत्पन्नावरुन त्या देशाचा आर्थिक विकास निश्चित केला जातो. याच सुत्रानुसार देशाचा पर्यावरणीय विकास ठरवायचा झाल्यास दरडोई किती वृक्ष आहेत, याचा विचार आता करावा लागेल. एका अहवालानुसार कॅनडात ८०० दरडोई वृक्ष, रशियात ७५० दरडोई वृक्ष आहेत. या तुलनेत भारतात दरडोई वृक्षांची संख्या ५० पेक्षाही कमीच आहे. याचाच परिणाम म्हणून भारताच्या अनेक भागात गंभीर दुष्काळाच्या झळा आपण सोसल्या आहेत.
भविष्यात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य शासनाने १ जुलै २०१६ रोजी राज्यभर २ कोटी वृक्ष लागवड योजना हाती घेतली असून राज्यात एकाच दिवशी वृक्ष लावण्याचा कार्यक्रम होणार आहे. भंडारा जिल्हा प्रशासन व वनविभागाने यासाठी खास मोहिम हाती घेतली असून जिल्ह्यात ८ लाख ५० हजार वृक्ष लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
राज्यात सध्या २० टक्के वनक्षेत्र असून ते राष्ट्रीय वन नितीनुसार ३३ टक्क्यांपर्यत वाढविण्याचा शासनाचा मानस आहे. या वर्षी म्हणजे २ कोटी, २०१७ ला ३ कोटी, २०१८ ला १० कोटी आणि २०१९ ला २५ कोटी असे चार वर्षात ३८ कोटी व ग्रामपंचायतीच्या जागांमध्ये १२ असे एकूण ५० कोटी वृक्ष लागवडीचा राज्याच्या वन विभागाचा मानस आहे.
जिल्ह्यात सर्व विभाग मिळून ८ लाख ५० हजार वृक्ष लावण्यात येणार असून त्यासाठी ८ लाख ५० हजार खड्डे खोदण्यात आले आहे. यात प्रामुख्याने वन विभाग, सामाजिक वनीकरण, वन विकास महामंडळ, जिल्हा प्रशासनाचे सर्व विभाग, जिल्हा परिषद, कामगार न्यायालय, सामाजिक संस्था यांच्यासह इतरही संस्था यात सहभागी होणार आहेत.
वृक्ष लागवड मोहिमेसाठी विरशी रोपवाटिका तालुका साकोली, शिवनीबांध तालुका साकोली, जांभळी तालुका लाखनी, रेंज आॅफिस भंडारा, कोका भंडारा, रोहा तालुका मोहाडी, डोंगरला तालुका तुमसर, भिव खिडकी तालुका पवनी व भिवखिडकी सामाजिक वनीकरण तालुका पवनी या ठिकाणी वन विभागाने रोप उपलब्ध करुन दिले आहेत. १ जुलै रोजी विविध ३९ जातीचे वृक्ष लावल्या जाणार आहेत.
२ कोटी वृक्ष लागवड इव्हेंट नसून मिशन आहे. सर्व विभागांनी व नागरिकांनी या मोहिमेत मनापासून सहभागी होणे आवश्यक आहे. या कार्यक्रमात झाड लावण्याची स्थळ निश्चिती, रोपांची उपलब्धता, खड्डे, रोपांची वाहतूक, मनुष्य बळाची उपलब्धता, रोपांना लागणारे पाणी या सर्व बाबींवर वन मंत्री स्वत: लक्ष ठेवून आहेत. यंत्रणा करत असलेल्या सर्व कामांची माहिती स्थळ, छायाचित्र आणि रोप लावण्यासाठी केलेल्या खड्डयांच्या अक्षांश रेखांशसह आॅनलाईन स्वरुपात वन विभागाच्या संकेतस्थळावर भरायचे आहे. (प्रतिनिधी)