प्रशासकीय मंजुरीविना केले तहसीलदारांनी भूमिपूजन !
By admin | Published: January 14, 2017 12:27 AM2017-01-14T00:27:31+5:302017-01-14T00:27:31+5:30
कान्हळगाव (सिरसोली) येथील शासकीय जागेतील मुरूमाच्या खाणीचे खोलीकरण करण्यात आले.
ग्रामस्थांची दिशाभूल : तोंडी आदेशाने सुरु झाले खोदकाम
मोहाडी : कान्हळगाव (सिरसोली) येथील शासकीय जागेतील मुरूमाच्या खाणीचे खोलीकरण करण्यात आले. यासोबतच त्यालगत नॅडेप कंपोस्ट टाकी तयार करण्यात आली. तथापि, या दोन्ही कामांना प्रशासकीय मान्यता नसतानाही मोहाडीचे तहसिलदारांनी तोंडी आदेशान्वये परस्पर कामे सुरू केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आता झालेल्या कामाची मजुरी कोण देणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मोहाडीचे तहसिलदार धनंजय देशमुख यांनी कान्हळगाव येथील काही नागरिकांना विश्वासात घेऊन गावानजीकच्या मुरूमाच्या खाणीतील मुरूम काढण्याचे तोंडी आदेश दिले. कान्हळगाव जलशिवार योजनेत समाविष्ट असल्यामुळे खाणीच्या खोलीकरणाचे काम हाती घेता येते, असे सांगण्यात आले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी त्या कामाचे भूमिपूजन करून घेतले. त्या खाणीतून लाखो रूपयांचे गौण खनिज काढण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
जलयुक्त शिवार योजनेमध्ये कान्हळगाव आहे. लोकसहभागातून काम केले. तलाव करायच आहे. गाव सुशोभीत होणार. ग्रामपंचायत व सगळे गावकरी मिळून सहभाग आहे. नॅडेप टाकीसाठी प्रशासकीय मान्यता आहे.
- धनंजय देशमुख, तहसीलदार मोहाडी.
कान्हळगाव जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट नाही. ग्रामपंचायत कडून कोणत्याच संबंधित कामाचे प्रस्ताव आले नाही. शासकीय जागेत काम करता येत नाही. संबंधित जागेचे कागदपत्रे दिली नाही. त्या दोन्ही कामाची प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही.
- मनोज हिरूडकर, खंडविकास अधिकारी, मोहाडी.
कान्हळगावात झालेल्या नॅडेप खाण खोलीकरणाचा कामाचा संबंध दूरवर नाही. याबाबत कुठे, कोणी, कसे काम केले, याबाबत कोणतीही माहिती नाही.
- सुनिल ब्राम्हणकर, ग्रामसेवक कान्हळगाव.