विद्यार्थ्यांमधील क्षमता लक्षात घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 10:33 PM2018-06-26T22:33:05+5:302018-06-26T22:33:42+5:30

केवळ विज्ञान शाखेतील शिक्षण घेऊनच विद्यार्थ्यांचे भविष्य घडविता येते, या गैरसमजातून स्वत: विद्यार्थी आणि पालकांनी बाहेर पडावे. विज्ञानाशिवायही इतर अनेक शाखा आहेत, त्याचाही विचार करावा. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उच्चपदाची नोकरी मिळविता येते आणि त्यासाठी १० वी, १२ वी पासूनच नियोजन करावे.

Take into account the capabilities of students! | विद्यार्थ्यांमधील क्षमता लक्षात घ्या!

विद्यार्थ्यांमधील क्षमता लक्षात घ्या!

Next
ठळक मुद्देदिलीप पुराणिक : करियर महायात्रा, प्रतिष्ठित नागरिक, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : केवळ विज्ञान शाखेतील शिक्षण घेऊनच विद्यार्थ्यांचे भविष्य घडविता येते, या गैरसमजातून स्वत: विद्यार्थी आणि पालकांनी बाहेर पडावे. विज्ञानाशिवायही इतर अनेक शाखा आहेत, त्याचाही विचार करावा. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उच्चपदाची नोकरी मिळविता येते आणि त्यासाठी १० वी, १२ वी पासूनच नियोजन करावे. विद्यार्थ्यांमधील क्षमता पालकांनी लक्षात घ्यावी, ती जाणून घ्यावी आणि त्यादृष्टीने नियोजन करावे, असे आवाहन प्रसिद्ध करियर कौन्सीलर दिलीप पुराणिक (सातारा) यांनी केले.
लॉयन्स क्लब ग्रिन सिटी, शिवसेना आणि भोंडेकर शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने येथील गुरूदत्त मंगल कार्यालयात करियर महायात्रा, प्रतिष्ठीत नागरिक तसेच १० आणि १२ वी परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉ. प्रकाश मालगावे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार प्रकाश जाधव, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, नगरसेवक संजय कुंभलकर, लॉयन्स क्लबचे झोनल चेअरपर्सन जॅकी रावलानी, सदानंद ईलमे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संजय रेहपाडे, लवकुश निर्वाण, सुधाकर कारेमोरे, मनोहर हेडावू, अरूण लाडे, राजेश करंडे, रवी लांजेवार, अ‍ॅड. धनराज खोब्रागडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य मनोज बागडे यांनी केले. १० वी आणि १२ वी नंतर निवडायचे अभ्यासक्रम, राज्यभरातील महाविद्यालये, त्यांचे पत्ते, विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना, शासनाच्या सवलती, स्पर्धा परीक्षा, त्यासाठीची पात्रता, परिक्षेचा पॅटर्न यासह इतर अनेक विषयांवर उपयुक्त माहिती देत दिलीप पुराणिक यांनी भविष्याची दिशा ठरवून त्यादृष्टीने वाटचाल करा, असा सल्ला दिला. सूर्य, चंद्र, ग्रह, तारे आणि दैवी शक्ती त्यांची वेळ पाळतात. परंतु, आपण मानव प्राणी वेळेच्या बाबतीत दक्ष नसतो. विद्यार्थी तर वेळेचे भानच ठेवत नाही आणि ती निघून गेल्यानंतर पश्चातापाची वेळ येते, असे सांगत वेळेचे भान ठेवा, असे आवाहन डॉ. प्रकाश मालगावे यांनी केले.
सुनिल मेंढे म्हणाले, नोकरी म्हणजेच आयुष्य हा भ्रम सोडून व्यवसायाकडे वळण्याचा प्रयत्न करावा. वशिला किंवा पैसा याचा वापर न करता स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून नोकरी मिळविता येते. त्यादृष्टीने नियोजन आणि तयारी करावी, असे आवाहन नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांनी केले.
भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थी स्पर्धा परिक्षेकडे वळावे, येथील विद्यार्थी आयएएस, आयपीएस व्हावेत, मोठ्या हुद्यावर जावेत, हे आपले स्वप्न आहे. विद्यार्थ्यांनी एमपीएससी, युपीएससी या परीक्षांसाठी कसून मेहनत घ्यावी, विद्यार्थी घडविण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करायला तयार आहोत, असा आधार नरेंद्र भोंडेकर यांनी दिला.
या कार्यक्रमाला नवनिवार्चीत खासदार मधुकर कुकडे यांनी भेट देत नरेंद्र भोंडेकर यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी, प्रतिष्ठीत नामवंत नागरिकांचा शाल व स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यावर्षी १० वी आणि १२ वीच्या परिक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या २०० पेक्षा अधिक गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. जिल्हाभरातून आलेले शिवसेनेचे पदाधिकारी तसेच शिवसैनिकांनी नरेंद्र भोंडेकर यांचा सत्कार यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार केला.
कार्यक्रमादरम्यान, प्रश्नोत्तराच्या तासात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची दिलीप पुराणिक यांनी समर्पक उत्तरे दिली. संचालन अभय बन्सोड यांनी केले. आभार प्रदर्शन संजय रेहपाडे यांनी केले. कार्यक्रमासाठी पुजा नर्सिंग कॉलेज, मंजुळाबाई भोंडेकर महाविद्यालय तसेच डीबीए टिचर्स ट्रेनिंग इन्स्टिट्युट, भंडाराचे कृष्णा ठोसरे, राकेश निखाडे, विजय कुंभरे, सोनेकर, मुकेश बांते, ट्युटर संगिता कटकवार, डहाट यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Web Title: Take into account the capabilities of students!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.