‘त्या’ कंत्राटदारावर आपत्ती निवारण कायद्याअंतर्गत कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:29 AM2021-07-25T04:29:29+5:302021-07-25T04:29:29+5:30
तुमसर नगरपरिषद क्षेत्रातील विलगीकृत (ओला व सुखा) कचरा घंटागाडी, स्वयंचलित वाहनांद्वारे संकलन करून घनकचरा व्यवस्थापन केंद्रापर्यंत वाहतूक करण्याचे काम ...
तुमसर नगरपरिषद क्षेत्रातील विलगीकृत (ओला व सुखा) कचरा घंटागाडी, स्वयंचलित वाहनांद्वारे संकलन करून घनकचरा व्यवस्थापन केंद्रापर्यंत वाहतूक करण्याचे काम नगरपरिषद प्रशासनाने शारदा महिला बचत गटाला दिले आहे. कंत्राटदार शासनाच्या नियमानुसार काम करत नसल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी प्रदीपचंद्रन यांनी पत्राद्वारे अंतिम अभिप्राय मागितले होते. ही संस्था चौकशीच्या भोवऱ्यात आहे. या कंत्राटदाराला देयक अदा करणे किंवा कसे सदर बाब शासनाकडे प्रलंबित आहे. या कंत्राटदाराला नगरपरिषदेने घनकचरा कामाचे आदेश दिले असून तसा करारनामा सुद्धा नगर परिषदेने केला आहे. आता कंत्राटदाराने शहरात मागील दोन आठवड्यांपासून स्वच्छतेचे काम बंद केले. करारनाम्यानुसार काम बंद करण्याचा त्यांना अधिकार नाही. काम बंद करण्यासंदर्भात नगरपरिषद अध्यक्ष किंवा मुख्याधिकाऱ्यांनी सूचनासुद्धा दिल्या नाही. या कंत्राटदाराने साथरोग अधिनियम १८९७ अन्वये निगर्मित केलेल्या अधिसूचना व नियमावलीतील तरतुदीनुसार व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये गुन्हा नोंद करून पाठपुरावा करून कारवाई करण्यात यावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
शिष्टमंडळात प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस सीमा भुरे, इंटकचे शहराध्यक्ष प्रेमदास राऊत, अनुसूचित जाती सेल शहराध्यक्ष नीशा गणवीर, दिनेश भवसागर, एनएसयूआयचे अध्यक्ष रोहित बोंबार्डे, जय डोंगरे, वनिता मलेवार यांचा समावेश आहे.