दोषी पोलिसांवर कारवाई करा
By Admin | Published: March 15, 2017 12:20 AM2017-03-15T00:20:55+5:302017-03-15T00:20:55+5:30
लाखांदूर येथे १६ वर्षीय मुलीवरील सामूहिक अत्याचाराची चित्रफित तयार करून सोशल मिडीयावर व्हायरल...
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : अखिल भारतीय माळी महासघांची मागणी
भंडारा : लाखांदूर येथे १६ वर्षीय मुलीवरील सामूहिक अत्याचाराची चित्रफित तयार करून सोशल मिडीयावर व्हायरल केल्याप्रकरणी दोषींना पाठीशी घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय माळी महासंघाने जिल्हाधिकारी अभिजीत डॉ.चौधरी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
पंधरा दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकरणावर लाखांदूर येथे पोलीस कर्मचाऱ्यांनी दोषींना पाठिशी घालण्यासाठीच कारवाई टाळली. अशा पोलिसांना शिक्षा ठोठावली जावी, अशी मागणी अखिल भारतीय माळी महासंघाचे विदर्भ प्रांताध्यक्ष अॅड. राजेंद्र महाडोळे, जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीकांत भुसारी यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. या निवेदनात, पीडित मुलगी ही अत्यंत गरीब घरची आहे. दहाव्या वर्गात शिकून व मोलमजुरी करुन कुटुंबाला आर्थिक हातभार लावणाऱ्या या पीडित मुलीला पाच तरुणाने जंगलात नेऊन सामूहिक अत्याचार केला. २५ फेब्रुवारीच्या हे प्रकरण या तरुणांनी मोबाईलवर चित्रफित तयार करुन ती सोशल मिडीयावर पसरविली. याची माहिती लाखांदूर येथील पोलीस निरीक्षकांसह पोलीस विभागाच्या सर्व यंत्रणेला असतांनाही त्यांनी कारवाई करण्याऐवजी आरोपींना पाठीशी घालण्याचा किळसवाणव प्रकार केला आहे. आरोपींना पाठीशी घालण्यामागे पोलीस विभागातील हेमंत चांदेवार या पोलीस निरीक्षकाचाही सहभाग असल्याचा आरोप या निवेदनातून केला आहे. दरम्यानच्या काळात पीडिता व तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची व घर पेटवून देण्याची धमकी दिल्याचीही बाब आता समोर आली आहे.
अशा गंभीर प्रकरणात तत्कालीन ठाणेदार व त्यांच्या अधिनस्थ गुप्तचर यंत्रणेचाही दोष असल्याने प्रकरण दडपण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचे उघड होते.
त्यामुळे या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनातून केली आहे. याची प्रतिलिपी मुख्यमंत्री, मानवधिकार आयोग, महिला आयोग यांच्याकडे पाठविण्यात आली आहे.
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात जि.प. सदस्य रेखा भुसारी, कैलास जामगडे, बी. एन. मदनकर, प्रकाश अटाळकर, बंडू बनकर, अनिल किरणापुरे, अॅड. रवि भुसारी, उमेश महाडोळे, नितेश किरणापुरे, मनोज बोरकर, यशवंत उपरीकर, माधवी देशकर, विजय शहारे, वृंदा गायधने, शंकर राऊत, बी. जी. किरणापुरे, ए. डी. बनकर आंदींची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)
महासंघाने या मागण्या केल्या आहेत
कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस निरीक्षक व अन्य कर्मचाऱ्यांची चौकशी करुन त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी, न्यायालयासमोर पीडित मुलगी व तिच्या आई-वडिलांचे बयाण नोंदवावे, आरोपींच्या कुटुंबीयांकडून पीडिता व तिच्या कुटुंबाला धोका असल्याने पोलीस संरक्षण द्यावे, ज्या मोबाईलधारकांकडे चित्रफित असेल अशांवर सायबर क्राईमअंतर्गत गुन्हा नोंदवावा, खटला जलदगतीने न्यायालयात चालवावा, घटनेचा संपूर्ण तपास सक्षम अधिकाऱ्यामार्फत करावा व सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.