शासनाच्या रोजगाराभिमुख योजनांचा लाभ घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 10:15 PM2018-09-24T22:15:30+5:302018-09-24T22:16:01+5:30
राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकराज्य मासिकात सविस्तर दिलेली असते. बंदीवान बांधवांनी कारागृहातून परत गेल्यानंतर लोकराज्यच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. विशेषत: रोजगार व स्वयंरोजगारासाठी शासनाने अतिशय उपयुक्त अशा योजना आखल्या असून या योजनांच्या माध्यमातून आपला आर्थिक व सामाजिक विकास साधला जाऊ शकतो. रोजगारभिमुख व उद्योगाभिमुख योजनांचा लाभ मोठया प्रमाणात घ्यावा, असे आवाहन कारागृह अधिक्षक अनुपकुमार कुमरे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकराज्य मासिकात सविस्तर दिलेली असते. बंदीवान बांधवांनी कारागृहातून परत गेल्यानंतर लोकराज्यच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. विशेषत: रोजगार व स्वयंरोजगारासाठी शासनाने अतिशय उपयुक्त अशा योजना आखल्या असून या योजनांच्या माध्यमातून आपला आर्थिक व सामाजिक विकास साधला जाऊ शकतो. रोजगारभिमुख व उद्योगाभिमुख योजनांचा लाभ मोठया प्रमाणात घ्यावा, असे आवाहन कारागृह अधिक्षक अनुपकुमार कुमरे यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने लोकराज्य वाचक अभियानांतर्गत भंडारा कारागृहात बंदीवान बांधवांसाठी लोकराज्य मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, पत्रकार ज्ञानेश्वर मुंदे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी अमृत आगाशे, तुरुंग अधिकारी रमेश मेंगळे व तुरुंग अधिकारी संतोष क्षीरसागर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात लोकराज्यच्या सामर्थ शिक्षणाचे, समृध्द महाराष्ट्राचे या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
राज्य शासनाने कौशल्यविकासावर भर दिला असून कौशल्यावर आधारित विविध योजना शासन राबवित आहे. प्रमोद महाजन कौशल्य विकास, प्रधानमंत्री मुद्रा योजना, शेतीपूरक कौशल्य प्रशिक्षण, पशुसंवर्धन दुग्धविकास, छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्यविकास, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, अणासाहेब पाटील व्याज परतावा योजना अशा अनेक योजना सामान्य माणसासाठी शासन राबवित आहे. या सर्व योजनांची माहिती शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्यमध्ये देण्यात आली आहे. बंदीवान बांधवांनी या योजनांचा लाभ घेवून आपले जीवन समृध्द करावे, असे अनुप कुमरे म्हणाले.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, शेतीपूरक व्यवसाय यासह शासनाच्या इतर योजनांचा लाभ तसेच लघुउद्योग करण्यासाठी सुलभ कर्ज घेवून आपली आर्थिक उन्नती करावी, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांनी केले. शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकराज्य मासिकात नियमितपणे दिली जाते. शासकीय वाचनालयात लोकराज्य मासिक उपलब्ध असून या माध्यमातून योजनांची माहिती घेवून संबंधित कार्यालयाशी संपर्क साधल्यास योजनांचा लाभ घेणे सोईचे होईल, असे त्यांनी सांगितले.
यासोबतच आरोग्य शिबीर, आरोग्य तपासणी, मनोरंजन, स्वच्छता अभियान तसेच समुपदेशन आदी सारखे कार्यक्रम नियमित घेण्यात येतात, अशी माहिती तुरंग अधिकारी रमेश मेंगळे यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन रमेश मेंगळे यांनी केले. या कार्यक्रमास तुरुंगातील अधिकारी, कर्मचारी व बंदीवान बांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते.