शासनाच्या योजनांची माहिती घेऊन लाभ घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 10:35 PM2018-03-09T22:35:50+5:302018-03-09T22:35:50+5:30
सर्वसामान्य व्यक्तींना शासकीय योजनांची माहिती व्हावी या उद्देशाने माहिती अभियान राबविण्यात येत असून विविध शासकीय विभागाच्या योजनांची जनतेने माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन लाखनीचे तहसीलदार अक्षय पोयाम यांनी केले.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : सर्वसामान्य व्यक्तींना शासकीय योजनांची माहिती व्हावी या उद्देशाने माहिती अभियान राबविण्यात येत असून विविध शासकीय विभागाच्या योजनांची जनतेने माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन लाखनीचे तहसीलदार अक्षय पोयाम यांनी केले. जिल्हा माहिती कार्यालय भंडारा व तहसिल कार्यालय, लाखनी यांच्या संयुक्त विद्यमाने लाखनी तालुक्यातील मानेगाव (सडक) येथे माहिती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते होते. प्रमुख अतिथी म्हणून खंडविकास अधिकारी ब्राम्हणकर, तालुका कृषि अधिकारी पदमाकर गिदमारे, नायब तहसिलदार शरद घारगडे, विनोद थोरवे, उपअधिक्षक भूमि अभिलेख नान्हे, वनपरिक्षेत्र अधिकारी कोळी, वैद्यकीय अधिकारी डहारे, मस्के, भास्कर डहारे, मानेगावचे सरपंच नरेंद्र भांडारकर उपस्थित होते.
अक्षय पोयाम यांनी जनतेला अपघात तसेच गुन्हाची माहिती या अॅपद्वारे पोलीसंपर्यंत तात्काळ पोहचविण्यासाठी मदत होते. त्यामुळे पोलीसाद्वारे कारवाई करणे सोईचे होते. ग्रामस्थांनी योजना समजावून घ्याव्यात व त्याचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले. रवी गिते यांनी अनेकदा शासकीय योजनांची माहिती लोकांना मिळत नाही. त्यामुळे लाभार्थी योजनेपासून वंचित राहतात. लोकांना या शासकीय सर्व योजनांची माहिती त्यांच्या गावातच मिळावी व त्याचा लाभ लोकांना व्हावा हा या अभियानाचा उद्देश आहे. योजनांची माहिती वृत्तपत्र व दूरदर्शनद्वारे जनतेस मिळावी हेच आमच्या विभागाचे काम आहे,
यावेळी डहारे यांनी आरोग्य विभागाच्या जननी शिशू योजना, स्तनदा माता, जननी शिशू सुरक्षा योजना मानव विकास सेवा योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, कुटूंब नियोजन सिकलसेल, क्षयरोगाबाबत माहिती दिली. कृषि विभागाचे भांडारकर यांनी जिल्हा निधी योजना, राष्टीय बायोगॅस विकास योजना, थेट हस्तांतरण योजना, डॉ. बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना बाबत माहिती दिली. गिदमारे यांनी शेतीचे दोन भाग पडतात एक पारंपारिक व दुसरे आधूनिक शेती आता आधूनिक शेती शिवाय पर्याय नाही. तसेच सोबत जोडधंदा आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवार अभियान, कषि यांत्रिकीकरण योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, सेंद्रिय शेतीबाबत माहिती दिली. ब्राम्हणकर यांनी पंचायत स्तरावरील योजना तसेच ओडीस प्लस, शौचालय योजना, घरकुल योजना, शबरी आवास योजना, मुलींना सायकल वाटप व भाग्यश्री योजनेबद्दल माहिती दिली.
यावेळी तहसिल कार्यालयातर्फे कुटूंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत अल्का सारवे, रेखा माने, मोनाली शिंदे, उर्मिला बोदेले यांना प्रत्येकी २० हजाराचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. तसेच शिधा पत्रिकेचे वाटप करण्यात आले. तसेच विविध प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
अभियानात आमआदमी विमा योजना शिष्यवृत्ती, संजय गांधी, इंदिरा गांधी , श्रावणबाळ योजना, सार्वजनिक वितरण प्रणाली, स्पर्श कुष्ठरोग अभियान, तालुका कृषि अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव, तालुका आरोग्य अधिकारी, कुष्ठरोग शोध मोहिम, अनूगामी लोकराज्य अभियान, तहसिल कार्यालय लाखनी, महाराष्ट्र सिटीजन पोर्टल व फिरते पोलीसठाणे, क्षयरोग इत्यादीं विभागाने एकूण १५ स्टॉल लावले होते. यावेळी मोठया संख्येने अधिकारी, कर्मचारी, गावकरी पुरुष व महिला उपस्थित होत्या.