सामाजिक न्याय विभागातील लोकोपयोगी योजनांचा लाभ घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 10:53 PM2018-11-26T22:53:21+5:302018-11-26T22:53:36+5:30
सामाजिक न्याय विभागाद्वारे विविध लोकोपयोगी योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केल्या जाते. त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेने घ्यावा. त्याचाच एक भाग सिंदपूरी येथे शासकीय सर्व सोयीने युक्त अशी वास्तू निर्माण करण्यात आली, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह पवनी (सिंदपूरी/रुयाळ ) येथील वसतीगृह उद्घाटनप्रसंगी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सामाजिक न्याय विभागाद्वारे विविध लोकोपयोगी योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केल्या जाते. त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेने घ्यावा. त्याचाच एक भाग सिंदपूरी येथे शासकीय सर्व सोयीने युक्त अशी वास्तू निर्माण करण्यात आली, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह पवनी (सिंदपूरी/रुयाळ ) येथील वसतीगृह उद्घाटनप्रसंगी केले.
महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त निवडक अनुसूचित जाती व बौद्ध वस्त्यांचा सर्वांगिण विकास योजनेंतर्गत पवनी तालुक्यातील मौजा कन्हाळगाव येथील विविध विकास कामाचे, तसेच मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, पवनीकरीता नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या मौजा सिंदपुरी/रुयाळ येथील वसतीगृह इमारतीचे उद्घाटन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार रामचंद्र अवसरे, पवनी पंचायत समितीचे सभापती धनराज ढेंगरे, जि.प. सदस्या मनोरथा जांभूळे, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड, सहाय्यक आयुक्त आशा कवाडे, उपविभागीय अभियंता सावरकर, रुयाळचे सरपंच माधुरी पचारे, उपसरपंच भोगे, धारगावे, कन्हाळगावचे सरपंच माया बावनकुळे, उपसरपंच धरमदास मेश्राम, एकनाथ नागपूरकर, जि. प. माजी अध्यक्षा किसनाबाई भानारकर, पं.स. सदस्य मनोहर आकरे, प्रकाश गेडाम, परसराम डडमल व इतर मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भूमीपूजन व उद्घाटन करण्यात आले.
आमदार रामचंद्र अवसरे यांनी या क्षेत्रातील विकासाकरीता कटिबध्द असल्याचे मनोगत व्यक्त केले. तसेच डॉ.सिध्दार्थ गायकवाड यांनी आपल्या प्रास्ताविकात विभागाद्वारे विविध योजना राबविल्या जातात, त्याची माहिती विषद केली. कार्यक्रमाचे संचालन बार्टीचे प्रकल्प अधिकारी बादल यांनी केले. आभार समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त आशा कवाडे यांनी मानले.
सदर कार्यक्रमांप्रसंगी सिनेअभिनेता व प्रबोधनकार अनिरुद्ध वनकर यांच्या ‘मी वादळ वारा’ या लोकगिताचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाला ग्रामवासी व परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी समाजकल्याण व सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व कर्मचारी, बार्टीचे समता दूत, वसतीगहाचे गृहपाल व कर्मचारी, बीव्हीजी कंपनीचे कर्मचारी तसेच वसतीगृहाचे विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.