महाराष्ट्रातून धान्य न्या, छत्तीसगडमधून रेती आणा ! रेती तस्करांचा नवा प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 14:44 IST2025-01-18T14:43:29+5:302025-01-18T14:44:32+5:30
Bhandara : ट्रेलरमधून व्हायची वाहतूक; छत्तीसगडच्या नक्षल क्षेत्रातून आली रेती

Take grain from Maharashtra, bring sand from Chhattisgarh! New type of sand smugglers
गोपालकृष्ण मांडवकर
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महाराष्ट्रातून छत्तीसगड राज्यात ट्रेलरमधून धान्य न्यायचे, आणि त्या रिकाम्या ट्रेलरमधून चोरीची रेती महाराष्ट्राच्या सीमेत आणून विल्हेवाट लावण्याचा प्रकार भंडारा पोलिसांच्या नाकाबंदीत उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ट्रेलरसह १० ब्रास रेती जप्त करून चालकाला अटक केली आहे. यातून रेती तस्करीची आंतरराज्यीय साखळी पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.
सेंदूरवाफा येथील नाकाबंदी चौकीवर मंगळवारच्या रात्री उशिरा पोलिसांना हा प्रकार लक्षात आला. नाकाबंदीदरम्यान, वाहनांची तपासणी करीत असताना एनएल ०१ / एजे २०२२ क्रमांकाच्या ट्रेलरमधून रेतीची वाहतूक होत असल्याचे लक्षात आले. ट्रेलरमधून रेतीची वाहतूक करणे अपेक्षित नसल्याने पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, या ट्रेलरमधून छत्तीसगड राज्यात धान्य, भाजीपाला अशा जीवनावश्यक वस्तू नेल्या जायच्या. परत येताना त्या रिकाम्या ट्रेलरमध्ये छत्तीसगड राज्यातून रेती भरून भंडारामार्गे नागपूरकडे नेली जायची, असा प्रकार पुढे आला. या संदर्भात अटक केलेल्या वाहनचालकाने, या पद्धतीने रेती चोरून नेण्याची ही तिसरी फेरी असल्याचे सांगितले. सत्येंद्रकुमार बिरेंद्रसिंग सिह (४१, गाडीगुडा, छत्तीसगड) याला अटक करून पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
पोलिस पोहचले छत्तीसगडमध्ये
जिल्हा पोलिस अधीक्षक नुरूल यांच्या पुढाकारात रेती तस्करीविरोधात पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली आहे. चौकशीसाठी पोलिसांचे पथक छत्तीसगडपर्यंत पोहचले. या तस्करीची अप्पर आणि लोअर लिंक तपासण्याचे काम पोलिसांनी आरंभले आहे. मात्र, रेतीघाट नक्षल क्षेत्रात असल्याने घाटमालकापर्यंत पोहचू शकले नाही.
छत्तीसगडच्या नक्षल क्षेत्रातून आली रेती
ही रेती छत्तीसगडमधील कांकेर जिलह्यातील डावेर घाटातून आणल्याचे चौकशीत पुढे आले आहे. विशेष म्हणजे हा परिसर नक्षलग्रस्त आहे. मार्गात बंदोबस्तही मोठा असतो. त्यावर मात करून वाहतूक झाल्याने या तस्करीची पाळेमुळे किती खोलवर रुजली असावी, याचा अंदाज येतो. नाकाबंदीदरम्यान हा सगळा प्रकार उघडकीस आणला गेला. त्यामुळे तस्करांची नवी शक्कल समोर आली.