शास्त्रांमध्ये सामाजिक परिवर्तनाची दखल घ्यावी
By admin | Published: December 23, 2014 10:58 PM2014-12-23T22:58:55+5:302014-12-23T22:58:55+5:30
सामाजिक शास्त्रांच्या आंतरसंबंधाची उकल करताना सामाजिक संशोधकांनी व अध्यापकांनी स्वत:ला विषयापुरते मर्यादित न ठेवता इतर सामाजिक शास्त्रांच्या विषय वस्तुला समजून घ्यावे.
भंडारा : सामाजिक शास्त्रांच्या आंतरसंबंधाची उकल करताना सामाजिक संशोधकांनी व अध्यापकांनी स्वत:ला विषयापुरते मर्यादित न ठेवता इतर सामाजिक शास्त्रांच्या विषय वस्तुला समजून घ्यावे. जेणे करून समाजामध्ये घडून येणाऱ्या सामाजिक परिवर्तनाचे विश्लेषन करणे शक्य होईल. परिणामी परिवर्तनातून उदयास येत असलेल्या समस्यांच्या सामना करण्यास आपण तयार होवू शकू, असे प्रतिपादन नागपूर विद्यापिठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी व्यक्त केले.
येथील जे.एम. पटेल महाविद्यालयात आयोजित सामाजिक शास्त्रांच्या अध्ययन मंडळाचे उद्घाटन प्रसंगी डॉ. देशपांडे बोलत होते. यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. विकास ढोमणे, इतिहास विभाग प्रमुख डॉ. ज्ञानेश्वर कडव, प्रा. डॉ. अमोल पदवाड, प्रा. सुमंत देशपांडे, नागपूर विद्यापिठाचे व्यवस्थापन समिती सदस्य महेंद्र निंबार्ते, प्रा. दिपक राऊत आदी उपस्थित होते. डॉ. देशपांडे म्हणाले, समाजशास्त्राचे सिद्धांत बदलत्या काळानुसार नव्याने विश्लेषित करण्याची गरज आहे. याप्रसंगी त्यांनी पटेल महाविद्यालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या गुणवत्ता पूर्ण शिक्षण व्यवस्थेचे कौतूक केले. प्राचार्य ढोमणे यांनी महाविद्यालयात असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी डॉ. अमोल पदवाड आणि प्रा. सुमंत देशपांडे यांनी संपादित केलेल्या 'साक्षेप' या आंतरविद्याशाखीय पिअर रिव्हुव्ड जर्नलचे विमोचण करण्यात आले. डॉ. देशपांडे यांच्या हस्ते गृहअर्थशास्त्र हस्तकला व सामाजिक शास्त्र भित्ती प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रा. वझलवार, डॉ. प्रदीप मेश्राम, डॉ. कार्तिक पणीकर, डॉ. सिद्धार्थ मेश्राम, प्रा. अनिल भांडारकर, डॉ. शोभा घाडगे, डॉ. निशा पडोळे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)