उन्हाच्या कडाक्यापासून जनावरांना वाचवण्यासाठी करा हे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 13:13 IST2025-03-08T12:40:45+5:302025-03-08T13:13:18+5:30

Bhandara : ३६ अंशांवर पोहोचले भंडारा जिल्ह्याचे तापमान

Take these measures to protect animals from the heatwaves in summer | उन्हाच्या कडाक्यापासून जनावरांना वाचवण्यासाठी करा हे उपाय

Take these measures to protect animals from the heatwaves in summer

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
वाढत्या उन्हामुळे पशुपालकांना नुकसानीला सामोरे जावे लागू शकते. दुभत्या जनावरांना उन्हाचा त्रास झाल्यास दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येऊ शकते. त्यामुळे उन्हाळ्यात पशुपालकांनी जनावरांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. जनावरांच्या चारा, पाण्याचे नियोजन तसेच गोठ्यातील तापमान नियंत्रणासाठी पशुपालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.


शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसायाकडे पाहिले जाते. मागील १५ दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान वाढत आहे. वाढत्या उन्हापासून जनावरांचे संरक्षण करणे आवश्यक असते. उन्हाळ्यात जनावरांच्या गोठ्याचे व आहाराचे व्यवस्थापन न केल्यास जनावरांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो.


तीव्र उष्णतेच्या लाटेचा दुग्ध व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. दुभती जनावरे जास्त दूधनिर्मिती करीत असल्यामुळे दूध निर्माण करताना शरीरात जास्तीची उष्णता निर्माण होते. परिणामी, दुभती जनावरे उन्हामुळे आजारी पडतात. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे दूध उत्पादनात १० ते २० टक्के घट येण्याची शक्यता असते. त्यामुळे पशुपालकांनी वेळीच काळजी घेत चारा, पाणी व तापमानाचे नियोजन करणे हिताचे ठरणारे असते.


श्वानांचीही काळजी घ्या
ग्रामीण भागासह शहरात श्वान पाळणाऱ्यांची संख्या अधिक आहे. उन्हाळ्यात श्वानांनाही त्रास होण्याची शक्यता असते. अशा वेळी पशुपालकांनी योग्य खबरदारी घेऊन लसीकरणासह जनावरांचे तापमान नियंत्रित राहील, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे असते.


जनावरांची काय काळजी घ्याल?

  • उन्हाळ्यात जनावरांना भूक कमी • आणि तहान जास्त वाढते. त्यामुळे गुरांना मुबलक स्वच्छ पाणी द्यावे, साधारण तीन वेळा पाणी पिण्यास द्यावे, त्यामुळे जनावरांच्या शरीरातील तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते.
  • पशुपालकांनी उन्हाळ्यात गुरांना २ हिरवा चारा खाण्यास द्यावा, तसेच चारा देताना तो कुट्टी करून दिल्यास जनावरांना खाण्यास मदत होते. याचबरोबर सुका चारा खाल्ल्याने जनावरांना पाण्याची गरज जास्त भासत असते. जर गुरांना पाण्यात मीठ आणि पीठ टाकून पिऊ घातल्यास ते अधिक फायदेशीर असते.


गुरांचे गोठे असावे स्वच्छ व हवेशीर
उन्हाळ्यात जनावरांची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. पशुपालकांनी गोठ्यात हवा खेळती ठेवावी, वेळोवेळी गोठा स्वच्छ ठेवावा, पाण्याच्या व चाऱ्याच्या वेळा पाळणे आवश्यक झाले आहे. याबाबत पशुपालकांनी लक्ष द्यावे.


"उन्हाळ्यात दाट सावलीच्या झाडाखाली, थंड गोठ्यात जनावरांची व्यवस्था करावी. वेळोवेळी लसीकरण करावे. उष्माघाताची लक्षणे दिसून आल्यास पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने उपचार करावा."
- जगन्नाथ देशट्टीवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.

Web Title: Take these measures to protect animals from the heatwaves in summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.