पावसाळा आला, विजांपासून वाचण्यासाठी खबरदारी घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 01:13 PM2024-05-20T13:13:33+5:302024-05-20T13:14:29+5:30
Bhandara : जिल्हा प्रशासनाकडून दक्षता घेण्याचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पावसाळा तोंडावर आला आहे. जून महिन्यात मान्सूनचा सुरुवातीचा पाऊस असतो. या काळात मोठ्या प्रमाणात वादळीवाऱ्यासह विजांचा कडकडाट पाहायला मिळतो, अशात विजा पडण्याच्या घटनाही घड्डू शकतात. यातून मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणावर होते. या पृष्ठभूमीवर नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून करण्यात आले आहे.
सद्यःस्थितीत जिल्ह्यात वळीवाचा पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी वादळीवारे आणि विजांच्या कडकडाटासह वळीवाचा पाऊस हजेरी लावत आहे. या वळीवाच्या पावसाच्या कालावधीत अनेक ठिकाणी वीज पडून जनावरे आणि माणसांचाही मृत्यू होण्याच्या घटना घडत असल्याचे दिसून येत आहे.
विजा चमकत असल्यास काय करू नये?
• शेतात जर ओलसरपणा असेल, तर अशा ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तींनी थांबू नये.
• जंगलात तुम्ही आधीच खोलगट भागामध्ये असाल, तर वरती येण्याचा प्रयत्न करू नका.
• चारचाकी वाहनातून प्रवास करीत असाल, तर विजा चमकत असताना वाहनाबाहेर येऊ नका.
• विजा चमकत असताना खुल्या मैदानामध्ये उभे राहणे टाळा.
• चुकूनही उंच झाडाचा आसरा घेऊ नका.
• विजेचा किंवा टेलिफोनचा खांब, तसेच टॉवर इत्यादी जवळ उभे राहू नका.
• शेत तसेच बाग, घराभोवती तारेचे कुंपण घालू नका, कारण ते विजेला आकर्षित करते.
• महत्त्वाचे म्हणजे एका वेळी जास्त व्यक्तींनी एकत्र राहू नका. दोन व्यक्तींमध्ये किमान १५ फुटांचे अंतर ठेवा.
• धातूची दांडी असलेल्या छत्रीचा वापर टाळा.
• पाण्याचा नळ तसेच फ्रिज, टेलिफोन यांना स्पर्श करू नका. आकाशात विजा चमकत असताना, चुकूनही मोबाइलचा वापर करू नका.
आकाशात विजा कडाडताना काय कराल?
• शेतात असताना आकाशात वीज कडाडू लागल्यास त्वरित शेतामधील शेड किंवा घराचा आसरा घ्या.
• पायाखाली प्लास्टिक किंवा गोणपाट, कोरडे लाकूड किवा कोरडा पाला पाचोळा ठेवा.
• दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून तळ पायावर बसा.
• पोहणारे किवा मासेमारांनी पाण्यातून बाहेर यावे व सुरक्षित आसरा घ्यावा.
• आजूबाजूला एखादे झाड असेल, तर त्या झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे राहावे.
• उंच झाडाच्या फांदीवर तांब्याची एक तार बांधा व तिचे दुसरे टोक जमिनीत खोलवर गाडून ठेवा.
• पक्क्या घरावर शक्य असल्यास वीज वाहक यंत्रणा बसवून घ्या.
• जंगलात असताना झाडांचा आधार घ्यावा लागल्यास कमी उंचीच्या व दाट झाडांचा आसरा घ्या.
• दुचाकी किवा सायकल, ट्रॅक्टर इत्यादी वाहनांवर असाल, तर तत्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जा.